पोलिसांपासून वाचण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून उडी, आरोपीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 10:42 AM2023-02-14T10:42:49+5:302023-02-14T10:46:25+5:30
उप्पलवाडीतील थरारक घटना : मृत्यूनंतर परिसरात तणाव, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
नागपूर : गोवंश तस्करीत फरार असलेल्या एका आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी चक्क तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. मात्र, ही उडी त्याच्यासाठी जीवघेणी ठरली. यात गंभीर जखमी झालेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उप्पलवाडी परिसरात ही घटना घडली. इम्रान कुरैशी उर्फ इरफान कुरैशी (२७, रा. उप्पलवाडी) असे मृतकाचे नाव आहे.
इम्रानविरोधात गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल होता. देवलापार पोलिस ठाण्यातील पथक त्याचा शोध घेत होते व तो उप्पलवाडीत लपला असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याला पकडण्यासाठी रविवारी दुपारी कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे पथक पोहोचले. पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना सोबत घेतले व त्याच्या घरावर धाड टाकण्याचे नियोजन केले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे पथक उप्पलवाडीतील म्हाडा कॉलनीत पोहोचले. इम्रान हा तेथील चौथ्या मजल्यावर राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते तेथे पोहोचले असता, तो चौथ्या मजल्यावर राहत असल्याी माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांना पाहून त्याने उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान सोमवारी सकाळी इम्रानचा मृत्यू झाला. यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. कपिलनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी लगेच उपचारासाठी का नेले नाही?
खाली उडी घेतलेली व्यक्ती इम्रान असल्याचे लक्षात आल्यावरदेखील पोलिस पथक तेथून तसेच परतले. जखमी अवस्थेत असलेल्या इम्रानला लगेच मेडिकलमध्ये दाखल का करण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रहिवासी प्रचंड संतापले असल्याने परतल्याचा दावा पोलिस पथक करत आहे. मात्र, हे कारण वरिष्ठांनादेखील पटण्यासारखे नाही. या घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.