प्रियकराने प्रेयसीला ठार करून तिच्या पतीस केले गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 08:23 PM2018-03-12T20:23:17+5:302018-03-12T20:24:13+5:30
प्रेयसी तिच्या पतीकडे जाणार असल्याचे लक्षात आल्यामुळे प्रियकराने पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला चढवला. यात पत्नी ठार झाली तर पती मृत्यूशी झुंज देत आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाते लेआऊटमध्ये आज पहाटे ३ च्या सुमारास ही थरारक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटर्वक
नागपूर : प्रेयसी तिच्या पतीकडे जाणार असल्याचे लक्षात आल्यामुळे प्रियकराने पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला चढवला. यात पत्नी ठार झाली तर पती मृत्यूशी झुंज देत आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाते लेआऊटमध्ये आज पहाटे ३ च्या सुमारास ही थरारक घटना घडली.
सीताश्वरी चंद्रकांत मडावी (वय २०) असे मृत महिलेचे नाव असून, मृत्यूशी झुंज देणाऱ्या तिच्या पतीचे नाव चंद्रकांत मडावी आहे. तो बालाघाटमधील रहिवासी आहे. सीताश्वरीचे आईवडीलही आधी बालाघाटमध्ये राहायचे. काही वर्षांपूर्वी ते रोजगाराच्या शोधात नागपुरात आले. सध्या ते दाते लेआऊटमध्ये एका बांधकामस्थळी राहतात. सीताश्वरी आणि चंद्रकांतचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते. त्यांच्यात खटके उडू लागल्याने ती नागपूरला परत आली. येथे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचा राजू पेंदूर काम करतो. त्यामुळे राजूचा भाऊ सचिन नेहमी येथे यायचा. त्यातून सचिनसोबत सीताश्वरीची ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ते तीन महिन्यांपूर्वी बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथे पळून गेले. तेथे हे दोघे दोन महिने पती-पत्नीसारखे सोबत राहिले. त्यादरम्यान सचिन व्यसनी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे तिला कळले. तो सारखा मारहाणही करायचा. त्यामुळे ती नागपूरला परत आली. तिच्या आईने तिच्या पहिल्या पतीची समजूत काढून त्याला बोलावून घेतले. त्यानेही मोठ्या मनाने सीताश्वरीला सोबत नेण्याचे कबुल केले. या पार्श्वभूमीवर, चंद्रकांत नागपुरात आला. हे सर्व सचिनला माहीत पडले. सीताश्वरी तिच्या पतीसोबत जाणार असल्याचे कळल्याने तो अस्वस्थ झाला. रविवारी रात्री चंद्रकांत आणि सीताश्वरी हे पती-पत्नीएकत्र एका झोपडीत झोपले. तर कुटुंबीय बाजूच्या झोपडीत होते. पहाटे ३च्या सुमारास सीताश्वरी आणि चंद्रकांतच्या किंकाळ्यांनी परिसर हादरला. बाजूच्या झोपड्यातून या दोघांचे नातेवाईक तसेच मजूर बाहेर आले तेव्हा आरोपी सचिन पळून गेला. त्याने सीताश्वरी आणि चंद्रकांतच्या डोक्यावर फावड्याने वार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. सीताश्वरी जागीच गतप्राण झाली तर चंद्रकांतची अवस्था गंभीर होती. मजुरांनी त्याची माहिती एमआयडीसी ठाण्यात दिली. लगेच पोलिसांचा ताफा पोहचला. सीताश्वरीचा मृतदेह मेडिकलला पाठविण्यात आला. चंद्रकांतवर उपचार सुरू आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.