मनोरुग्ण नेरकर हत्या प्रकरणातील आरोपी मोकाटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 10:00 PM2018-04-12T22:00:26+5:302018-04-12T22:00:37+5:30
प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७० वर्षीय मनोरुग्ण मालती पाठक यांची गळा दाबून झालेल्या हत्या प्रकरणात मानकापूर पोलिसांनी तब्बल दीड वर्षांच्या तपासानंतर मंगळवारी आरोपीविरुद्ध ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परंतु या घटनेच्या २० दिवसांपूर्वी घडलेल्या जयंत नेरकर (४४) हत्येच्या प्रकरणात अद्यापही कुणावरच गुन्हा दाखल झालेला नाही. विशेष म्हणजे, या दोन्ही घटनेत आरोग्य विभागाकडून चौकशी झाली परंतु अद्यापही कुणावरच कारवाई झाली नसल्याने प्रकरण दाबण्याचा तर प्रयत्न होत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७० वर्षीय मनोरुग्ण मालती पाठक यांची गळा दाबून झालेल्या हत्या प्रकरणात मानकापूर पोलिसांनी तब्बल दीड वर्षांच्या तपासानंतर मंगळवारी आरोपीविरुद्ध ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परंतु या घटनेच्या २० दिवसांपूर्वी घडलेल्या जयंत नेरकर (४४) हत्येच्या प्रकरणात अद्यापही कुणावरच गुन्हा दाखल झालेला नाही. विशेष म्हणजे, या दोन्ही घटनेत आरोग्य विभागाकडून चौकशी झाली परंतु अद्यापही कुणावरच कारवाई झाली नसल्याने प्रकरण दाबण्याचा तर प्रयत्न होत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
‘स्किझोफ्रेनिया’ची रुग्ण मालती पाठक (६०) यांचा मृत्यू ६ आॅक्टोबर २०१६ रोजी त्यांच्याच वॉर्डात झाला. पाठक यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर त्यांची गळा दाबून हत्या झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १२ फेब्रुवारीच्या अंकात ‘पुन्हा एका मनोरुग्णाची गळा आवळून हत्या’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. यापूर्वी, १७ सप्टेंबर २०१६ रोजी जयंत नेरकर (४४) या मनोरुग्णाचीही गळा आवळून हत्या झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करून मनोरुग्णालयाचा गैरकारभारच चव्हाट्यावर आणला होता. सध्या या दोन्ही प्रकरणाची चौकशी मानकापूर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. यातील मालती पाठक प्रकरणात तब्बल दीड वर्षानंतर मंगळवार १० एप्रिल रोजी पाठक यांच्या वॉर्डात ड्युटीवर तैनात दोन महिला कर्मचाऱ्यांनी निष्काळजी केल्याची बाब समोर आली. मानकापूर पोलिसांनी तपासानंतर आरोपीविरुद्ध ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेला घेऊन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. बुधवारी अटेंडंट व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनही केले. परंतु पाठक यांच्या घटनेच्या २० दिवसांपूर्वी जयंत नेरकर यांची हत्याही गळा दाबून झाली. शवविच्छेदनाचा तसा अहवाल आहे. हिवाळी अधिवेशनात हे प्रकरणही गाजले. या प्रकरणातही आरोग्य विभागाच्या उपसंचालक स्तरावर चौकशी झाली. पोलिसांनी तपास यंत्रणा हलवली. मात्र, दीड वर्षांचा कालावधी होऊनही आरोपी मोकाटच आहे. या घटनेला घेऊन पोलीस व प्रशासन सुस्त असल्याचे चित्र आहे.
पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यावरच कारवाई
जयंत नेरकर प्रकरणात पोलिसांची चौकशी अद्यापही सुरूच आहे. चौकशीत जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु या दरम्यान नागपूर उपसंचालक स्तरावर चौकशी समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली आहे.
-डॉ. साधना तायडे
सहसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग
दोघांवर विभागीय कारवाई
जयंत नेरकर प्रकरणात उपसंचालकस्तरावर समिती नेमून चौकशी करण्यात आली होती. यात एक पुरुष अटेन्डंट व स्टाफ नर्स दोषी आढळून आले आहे. त्यांच्यावर लवकरच विभागीय कारवाई करण्यात येईल.
-डॉ. संजय जयस्वाल
उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, नागपूर