नागपुरात प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीने घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 09:54 PM2018-03-13T21:54:58+5:302018-03-13T21:55:16+5:30
प्रेयसीची हत्या करून तिच्या पतीला गंभीर जखमी करणारा आरोपी सचिन किशोर पेंदूर (वय २५, रा. दारोडा, हिंगणघाट, जि. वर्धा) याने विषप्राशन करून आपल्या गावाजवळच्या पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेयसीची हत्या करून तिच्या पतीला गंभीर जखमी करणारा आरोपी सचिन किशोर पेंदूर (वय २५, रा. दारोडा, हिंगणघाट, जि. वर्धा) याने विषप्राशन करून आपल्या गावाजवळच्या पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्याला सेवाग्राम इस्पितळात दाखल केले आहे. दुसरीकडे त्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला चंद्रकुमार मडावी याची प्रकृती अजूनही चिंताजनक असून, त्याच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाते ले-आऊटमध्ये सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास ही थरारक घटना घडली होती.
पतीसोबत मतभेद झाल्याने बालाघाटमधून गीतीश्वरी चंद्रकुमार मडावी (वय २०) ही नागपूरला येऊन आपल्या आईवडिलाकडे राहू लागली. तिचे येथे आरोपी सचिन पेंदूरसोबत अनैतिक संंबंध निर्माण झाले होते. त्यातून डिसेंबर २०१७ मध्ये हे दोघे बल्लारपूरला (जि. चंद्रपूर) पळून गेले. तेथे दोन महिने राहिल्यानंतर सचिन व्यसनी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे तिला कळले. तो सारखा मारहाणही करायचा. त्यामुळे गीतीश्वरीने आपल्या वडिलांना फोन करून बोलवून घेतले आणि वडिलांसोबत तीन दिवसांपूर्वी नागपूरला परत आली. सचिनपासून धोका होऊ शकतो, असेही आईवडिलांना सांगितले. ते लक्षात घेत तिच्या आईवडिलांनी मध्यस्थामार्फत गीतीश्वरीचा पती चंद्रकुमारला निरोप पाठवून पत्नीला घेऊन जाण्याची विनंती केली. त्यानुसार, चंद्रकुमार तीन दिवसांपूर्वी नागपुरात आला. हे सर्व सचिनला माहीत पडले. गीतीश्वरी तिच्या पतीसोबत गावाला जाणार असल्याचेही त्याला कळले. त्यामुळे त्याने गीतीश्वरी आणि तिच्या पतीला संपविण्याचा कट रचला. रविवारी पहाटे ३ च्या सुमारास चंद्रकुमार आणि गीतीश्वरी हे पती-पत्नी एका झोपडीत साखरझोपेत असताना गीतीश्वरी आणि चंद्रकुमारच्या डोक्यावर कुदळीचे (टिकास) वार केले. यामुळे गीतीश्वरी जागीच गतप्राण झाली. तर, गंभीर अवस्थेतील तिच्या पतीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. या हत्याकांडानंतर आरोपी आपल्या मूळगावी वर्धा जिल्ह्यात पळून गेला होता.