सीसीटीव्हीमुळे आढळले १८ लाखांची घरफोडी करणारे आरोपी
By योगेश पांडे | Published: February 9, 2024 10:25 PM2024-02-09T22:25:24+5:302024-02-09T22:25:39+5:30
पारडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
नागपूर: घराला कुलूप लावून भावाच्या लग्नासाठी गेलेल्या टिंबर व्यापाऱ्याच्या घरातील १८ लाख रुपये लंपास करणाऱ्या आरोपींचा सीसीटीव्हीमुळे शोध लागला. पारडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
शिवकुमार चैतराम निनावे (५२, रा. भवानीनगर, पारडी) असे संबंधित व्यापाऱ्याचे नाव आहे. ते ३१ जानेवारीला सकाळी ११ वाजता ते १ फेब्रुवारीला सकाळी ७ दरम्यान आपल्या घराला कुलूप लावून भावाच्या लग्नासाठी बाहेर येथे गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या वॉल कंपाऊंड व मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरूममधील आलमारीचे कुलूप तोडून लॉकरमधील १८ लाख रुपये चोरून नेले. या प्रकरणी निनावे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुरू केला. त्यात दिसलेल्या आरोपींची माहिती खबऱ्यांच्या नेटवर्कमधून काढण्यात आली. पोलिसांनी मुख्य आरोपी शकरलाल उर्फ शकरू मदन टंडन (२८, शिवशक्ती नगर, पारडी), रितीक उर्फ समोसा कन्हैया झा (१९, शिवशक्ती नगर, पारडी) आणि एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. घरफोडी केल्यावर आरोपींनी हर्ष उर्फ हऱ्या युवराज इंगोले (२२, शिवनगर गल्ली नंबर तीन, पारडी), तुषार उर्फ एमडी रामेश्वर बिसेन (२२, श्यामनगर, पारडी), कुणाल उर्फ रवी उर्फ बारीक राममुरत गुप्ता (१९, दुर्गानगर, पारडी) यांना घरफोडीबाबत माहिती दिली.
हर्ष व तुषार यांनी आम्ही सगळे सांभाळून घेऊ असे म्हटले. त्यानंतर सर्व आरोपींनी रक्कम वाटून घेतली. आरोपींकडून पोलिसांनी रोख ६.५६ लाख, दुचाकी असा ६.९६ लाख रुपये जप्त केले. सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी काठे, राजेंद्र जाधव, हनुमंत इंगळे, विजय दासरवार, संदीप लांडे, विजय पेंदाम, शैलेश कुंभलकर, शरद राघोर्ते, भूषण झारकर, योगेश बोरकर, निखील मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.