भंडाऱ्यातील १८ लाखांच्या घरफोडीच्या आरोपीला नागपुरात अटक
By योगेश पांडे | Updated: February 6, 2025 15:43 IST2025-02-06T15:43:06+5:302025-02-06T15:43:45+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने ही कारवाई केली.

भंडाऱ्यातील १८ लाखांच्या घरफोडीच्या आरोपीला नागपुरात अटक
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भंडाऱ्यातील १८ लाखांच्या घरफोडीतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी त्याला संशयावरून थांबविले व झडतीत त्याच्याकडे रोख रक्कम व दागिने आढळल्याले हा प्रकार समोर आला. त्याने लग्नकार्यासाठी असलेल्या रकमेवर डल्ला मारला होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने ही कारवाई केली.
रोशन सेवकदास मेश्राम (४१, भीमटेकडी, गिट्टीखदान) असे आरोपीचे नाव आहे. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी त्याने भंडारा येथे महेश सुरेश मंत्री (४१, शास्त्रीनगर, गुरुनानक वॉर्ड) यांच्या घराचे कुलूप तोडून १८ लाखांची रोख व दागिने लंपास केले होते. हा मुद्देमाल मंत्री यांच्याघरील लग्नाचा होता. भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. बुधवारी साडेचार वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना गिट्टीखदान येथील आयबीएम मार्गावर मोपेडवरून जात असताना पोलिसांनी मेश्रामला संशयावरून थांबविले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणावर रोकड व दागिने आढळले. त्याला पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या कार्यालयात घेऊन गेले. तेथे त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
मात्र पोलीसी खाक्या दाखविल्यावर त्याने भंडारा येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ८.६८ लाखांची रोख रक्कम व ७.७१ लाखांचे दागिने तसेच मोबाईल, दुचाकी असा १७.४४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मेश्रामला भंडारा पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.