वकिलाला दुचाकीवरून पाडल्याचा आरोप; पोलिस निरीक्षकावर कारवाईसाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 08:44 PM2023-01-11T20:44:10+5:302023-01-11T20:44:35+5:30
Nagpur News रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका वकिलाला वाहतूक पोलिस निरीक्षकाने दुचाकीवरून खाली पाडल्याचा आरोप करीत जिल्हा व सत्र न्यायालयातील शेकडो वकिलांनी बुधवारी आंदोलन केले.
नागपूर : रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका वकिलाला वाहतूक पोलिस निरीक्षकाने दुचाकीवरून खाली पाडल्याचा आरोप करीत जिल्हा व सत्र न्यायालयातील शेकडो वकिलांनी बुधवारी आंदोलन केले. दरम्यान, त्यांनी न्यायालयातील पोलिस चौकीला घेराव घातला. तसेच, संबंधित वाहतूक पोलिस निरीक्षकाविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदविली. वकिलांच्या आंदोलनामुळे न्यायालय व पोलिस ठाण्यात काही काळाकरिता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ॲड. तहसीन गुलाम रझ्झाक असे वकिलाचे तर, बबन एडगे असे वाहतूक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. ॲड. रझ्झाक यांना जिल्हा न्यायालयातून प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा ग्राहक आयोगात जायचे होते. त्याकरिता ते दुचाकीने रोडच्या विरुद्ध दिशेने आयोगाकडे जात होते. दरम्यान, एडगे यांनी त्यांना थांबविले. त्यावेळी कारवाईवरून या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रझ्झाक दुचाकी सुरू करून पुढे जायला निघाले असता एडगे यांनी त्यांना पकडून खाली पाडले. त्यामुळे रझ्झाक यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. एडगे यांनी रझ्झाक यांना मदतही केली नाही. उलट त्यांना कडक कारवाई करण्याची व वकिलांची फौज आणली तरी सोडणार नाही, अशी धमकी दिली, असा आरोप वकिलांच्या वतीने केला जात आहे. एडगे यांनी यापूर्वीही सात-आठ वकिलांवर कारवाई करण्यासाठी कायदा हातात घेतला होता, असे वकिलांचे म्हणणे आहे. मात्र, आजच्या घटनेनंतर वकिलांनी पोलिसांविरुद्ध नारेबाजी करीत न्यायालय परिसरातील पोलिस चौकीला घेराव घातला. तसेच, एडगे यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा व त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशा मागण्या केल्या. रझ्झाक यांनी एडगे यांच्याविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. परंतु, त्यावरून एडगे यांच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्यात आला नाही. वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्त चेतना तिडके यांनी प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे व चौकशीनंतर कायद्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे ‘लोकमत’ला सांगितले.
एडगे यांच्या बडतर्फीवर जोर दिला जाणार नाही
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी एडगे यांची विभागीय चौकशी व बदली करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, एडगे यांनी त्यांची चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्याची मागणी लावून धरली जाणार नाही व काम बंद आंदोलनही केले जाणार नाही, अशी माहिती जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. कमल सतुजा यांनी ‘लोकमत’ला दिली.