पोलिसांना गुंगारा देत कोर्टातून मोक्काचा आरोपी पसार; तीन तासात केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 08:03 PM2022-07-30T20:03:32+5:302022-07-30T20:03:57+5:30
Nagpur News पोलीस कर्मचारी गप्पात रंगल्याचा फायदा घेत कामठी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या परिसरातून मोक्काचा आरोपीने पसार झाला. शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
नागपूर : पोलीस कर्मचारी गप्पात रंगल्याचा फायदा घेत कामठी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या परिसरातून मोक्काचा आरोपीने पसार झाला. शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शेख जाफर पठाण शेख मुजफ्फर (३७) रा. रमा नगर, कामठी असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ३ तासात त्याच्या मुसक्या बांधल्या.
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोड्याच्या प्रकरणातील आरोपी शेख जाफर पठाण शेख मुजफ्फर, शेख शबिब, मोहम्मद आबीद ऊर्फ चाटी (सर्व रा. कामठी) हे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. यातील तिन्ही आरोपींची शनिवारी कामठी येथील प्रथम श्रेणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात पेशी होती. त्यानुसार नागपूर मध्यवर्ती कारागृहातील सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल तुकाराम कावरे आणि पोलीस कर्मचारी तिन्ही आरोपींना कामठीच्या न्यायालयात दुपारी १ वाजताच्या सुमारास घेऊन आले होते. त्यांना न्यायालयात हजर करायला नेत असताना न्यायाधीश उपस्थित नसल्याचे समजल्याने पोलीस कर्मचारी आरोपींना न्यायालयाच्या दाराजवळ घेऊन उभे राहिले. यातच उपस्थित पोलीस कर्मचारी गप्पात रंगल्याचे पाहून या तीन आरोपींमधील सराईत गुन्हेगार असलेला शेख जाफर पठाण शेख मुजफ्फर याने हातातील दोरखंड सोडून अंमलदाराला झटका मारून न्यायालयातून पळ काढला. तिथे उपस्थित पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने न्यायालय इमारतीच्या पाठीमागील झाडीझुडपातून पळ काढला. ही माहिती कळताच पोलिसांचा मोठा ताफा न्यायालयात दाखल झाला.
पारसीपुरा नाल्याच्या झुडपातून केली अटक
पोलिसांची नजर चुकवित शेख जाफर पठाण शेख मुजफ्फर हा न्यायालयाच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून रेल्वे लाईन पलीकडील नाल्याने झुडपातून पारसीपुरा नाल्याच्या झुडपापर्यंत पोहोचला. तिथे तो लपून बसला होता. पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांच्या नेतृत्वातील पथकाने या परिसरात सर्च ऑपरेशन राबवून दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्याला अटक केली. यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची नागपूर कारागृहात रवानगी केली.