वन विभागाच्या धाव चाचणीत टायमिंग, मार्क न सांगितल्याचा आरोप; पालकांनी घातला गोंधळ
By दयानंद पाईकराव | Published: February 22, 2024 03:37 PM2024-02-22T15:37:56+5:302024-02-22T15:38:13+5:30
वन अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर झाले शांत
नागपूर : वन विभागाच्या मिहान परिसरात सुरु असलेल्या वनरक्षक पदाच्या भरतीत झालेल्या धाव चाचणीत गुरुवारी उमेदवारांना चाचणी पूर्ण केल्यानंतर टायमिंग न सांगितल्याचा आरोप करीत उमेदवारांच्या पालकांनी गोंधळ घातला. परंतु ही भरती प्रक्रीया ऑनलाईन आणि पारदर्शकपणे होत असून यात कुठलाच मानवी हस्तक्षेप करण्यात येत नसल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पटवून सांगितल्यानंतर संतापलेले पालक शांत झाले.
वन विभागाच्या वतीने वनरक्षक या पदासाठी महिला आणि पुरुष उमेदवारांची धाव चाचणी २१ फेब्रुवारी २०२४ पासून मौजा कलकुही, लुपिन चौक, मिहान येथे घेण्यात येत आहे. गुरुवारी मात्र या भरती प्रक्रियेत पालकांनी गोंधळ घातला. ३ किलोमिटरची धाव चाचणी पूर्ण केलेल्या महिला उमेदवारांना त्यांचे टायमिंग आणि मार्क सांगण्यात आले नसल्याचा आरोप पालकांनी केला. यामुळे काही काळासाठी येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर अधिकाऱ्यांनी पालकांची समजुत घालून त्यांना भरती प्रक्रिया इन कॅमेरा व पारदर्शकपणे राबविण्यात येत असल्याची माहिती दिल्यानंतर पालक शांत झाले.
भरती प्रक्रिया पारदर्शक
‘वन विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेली वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. यात सर्व प्रक्रीया आॅनलाईन असल्यामुळे कुठलाही मानवी हस्तक्षेप करण्यात येत नाही. सर्व उमेदवारांना त्यांचे टायमिंग आणि मार्क सांगण्यात येत आहेत. परंतु पालकांना टायमिंग आणि मार्क सांगणे ही वन विभागाची जबाबदारी नाही. आक्षेप घेतलेल्या पालकांना ही बाब समजुन सांगितल्यानंतर ते शांत झाले.’ -डॉ. भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक तथा सदस्य सचिव प्रादेशिक निवड समिती नागपूर