नागपुरातील पिन्नू पांडे फायरिंग प्रकरणातील आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:55 AM2018-10-21T00:55:31+5:302018-10-21T00:57:10+5:30
कुख्यात गुंड सुमित ठाकूर याचा साथीदार आणि गिट्टीखदानमधील कुख्यात गुंड पिन्नू पांडे याच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपात मोक्का लावण्यात आल्यानंतर फरार झालेला गुंड दिशान ऊर्फ जेडे खान गुलशेर खान याला जरीपटका पोलिसांनी शनिवारी सायंकाळी नाट्यमयरीत्या अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुंड सुमित ठाकूर याचा साथीदार आणि गिट्टीखदानमधील कुख्यात गुंड पिन्नू पांडे याच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपात मोक्का लावण्यात आल्यानंतर फरार झालेला गुंड दिशान ऊर्फ जेडे खान गुलशेर खान याला जरीपटका पोलिसांनी शनिवारी सायंकाळी नाट्यमयरीत्या अटक केली.
कुख्यात सुमित ठाकूर याच्या टोळीचा सदस्य असलेला जेडे खान खतरनाक गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ठाकूर टोळीचा प्रतिस्पर्धी गुंड पिन्नू पांडे याचा गेम करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी कुख्यात सुमितने कट रचला होता. त्यानुसार, आपल्या साथीदारांकडून त्याच्यावर सुमितने गोळ्या चालवल्या. मात्र, शूटरचा नेम चुकल्याने गोळी पायाला लागली. त्यामुळे पांडे बचावला. या गुन्ह्यात गिट्टीखदान पोलिसांनी सुमित ठाकूर टोळीच्या गुंडांना अटक केल्यानंतर या टोळीविरुद्ध मोक्का लावला. सुमितचा शोध घेत त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महिन्यांपूर्वी अटक केली. या गुन्ह्यात जेडेचाही समावेश होता. मात्र, तो फरार झाला. गिट्टीखदान पोलीस, गुन्हे शाखा तसेच ठिकठिकाणचे पोलीस जेडेचा शोध घेत होते. तो जरीपटक्यातील वेकोलिच्या इमारतीजवळ घुटमळत असल्याची माहिती जरीपटक्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय चप्पे आणि नायक रोशन तिवारी यांना शनिवारी सायंकाळी ६.३० ला कळली. त्यांनी ही माहिती ठाणेदार पराग पोटे यांना देऊन लगेच आपल्या साथीदारांसह तिकडे धाव घेतली. पोलिसांची कुणकुण लागताच पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या जेडे खानच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या.