नागपूर जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्याला आरोपींनी दिला कारने धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:00 PM2018-01-24T12:00:19+5:302018-01-24T12:02:55+5:30
एका प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा कळमेश्वरचे ठाणेदार विशाल ढुमे यांना आरोपींनी पळण्याच्या प्रयत्नात धक्का दिला. त्यात ते किरकोळ जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा कळमेश्वरचे ठाणेदार विशाल ढुमे यांना आरोपींनी पळण्याच्या प्रयत्नात धक्का दिला. त्यात ते किरकोळ जखमी झाले. दुसरीकडे या घटनेवरून वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहे. याबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी संपर्क साधला असता आरोपींनी पोलीस अधिकाऱ्याला धक्का दिल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.
परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्याकडे कळमेश्वर पोलीस ठाण्याचा प्रभार देण्यात आला आहे. त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोहणी येथे शेती खरेदीवरून वाद सुरू आहे. राजेश यादव (५०, रा. के.जी.एन. सोसायटी, फ्रेन्डस् कॉलनी, नागपूर) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांनी फैज अजीज नफिक सिद्दीकी (३८, रा. बोरगाव) याच्याकडील गोहणी शिवारातील तीन एकर शेती घेण्याचा सौदा करून विक्री करून घेतली. मात्र फैजने जास्त पैशाची मागणी केल्याने राजेशसमोर पेच निर्माण झाला होता. त्यातूनच फैजने शेतीचा कब्जा देण्यास मज्जाव केला होता. शेतीवर काही तरुणांना तैनातही केले होते. या प्रकरणात राजेशने कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
त्या तक्रारीवरून प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ढुमे हे पोलीस पथकासह गोहणी येथे मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास गेले होते. घटनास्थळी काही तरुण हे स्विफ्ट कारमध्ये असल्याचे दिसले. ढुमे हे कारपर्यंत जाऊन चावी काढण्याच्या प्रयत्नात होते. तर आरोपी हे कारमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना थांबविण्याच्या प्रयत्नात कारचे दार उघडत असताना ढुमे पाटील यांना कारचा धक्का लागला आणि पडले. त्यात ते किरकोळ जखमी झाले.
याबाबत कळमेश्वर पोलिसांशी संपर्क साधला असता अशी काही घटनाच घडली नसल्याचे त्यांनी सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनीही घटनेत काही तथ्य नसल्याचे सांगितले. दुसरीकडे सदर घटना ही खरी असून पोलीस मात्र ते का बरे लपवित आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
आरोपींनी दिल्या पोलिसांच्या हातावर तुरी
या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. घटनास्थळी आरोपींपर्यंत पोलीस पोहोचले होते. आरोपींना पकडणार तेवढ्यात कारमधून आरोपी पळण्याच्या प्रयत्नात होते.
ही बाब परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या निदर्शनास येताच ते कारच्या दिशेने गेले. कारची चावी काढून आरोपींना पकडण्याची तयारी करीत असताना आरोपींनी जबर धक्का देत कारने पळाले. पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी हे घटनास्थळाहून पसार झाले. ही बाजू असताना पोलीस मात्र घटनेला ‘सौम्य’ सांगत आहे. या प्रकरणात आणखी काही नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
प्रकरण रंगविले जात आहे - पोलीस अधीक्षक
दरम्यान नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी संपर्क केला असता, ‘आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना थांबवित असताना कारचा हलकासा धक्का ढुमे यांना लागला. हे प्रकरण सोशल मीडियावर रंगविले जात आहे. त्यात काही सत्यता नाही’ असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.