आरोपीची १० वर्षे कारावासाची शिक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:58 PM2019-08-20T23:58:30+5:302019-08-21T00:00:27+5:30
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला. पीडित मुलीचे बयान विश्वासार्ह असून सरकार पक्ष आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात यशस्वी ठरला आहे असा निष्कर्ष न्यायालयाने निर्णयात नोंदवला.
विनोद देवीप्रसाद मेहरा (२५) असे आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी आहे. ही घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. ११ मार्च २०१९ रोजी विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. घटनेच्या वेळी पीडित मुलगी केवळ ७ वर्षे वयाची होती. ती टेका नाका येथे कुटुंबीयांसोबत रहात होती. आरोपी तिला ओळखत होता. १२ डिसेंबर २०१५ रोजी आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.