रेमडेसिविर काळाबाजारमध्ये आरोपीला पाच वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:09 AM2021-09-22T04:09:49+5:302021-09-22T04:09:49+5:30
नागपूर : सत्र न्यायालयाने मंगळवारी रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणामध्ये मुख्य आरोपी निखिल बळवंत डहाके (२६) याला कमाल पाच वर्षे ...
नागपूर : सत्र न्यायालयाने मंगळवारी रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणामध्ये मुख्य आरोपी निखिल बळवंत डहाके (२६) याला कमाल पाच वर्षे सश्रम कारावास व एकूण सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्या. पी. बी. घुगे यांनी हा निर्णय दिला.
डहाके वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथील मूळ रहिवासी असून तो २५ एप्रिल २०२१ पासून कारागृहात आहे. अन्य दोन आरोपी दीपक श्रीराम महोबिया (२७) व संजय शिवपाल यादव (२८) यांना ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले. २५ एप्रिल २०२१ रोजी राणा प्रतापनगर पोलिसांना आरोपी डहाके हा रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी डहाकेला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. बनावट ग्राहकाने डहाकेसोबत संपर्क साधल्यानंतर त्याने एक रेमडेसिविर इंजेक्शनची किंमत ३० हजार रुपये सांगून आयटी पार्क रोडवर भेटायला बोलावले. त्यानुसार, बनावट ग्राहक डहाकेला भेटला व त्याचवेळी डहाकेला रेमडेसिविर इंजेक्शनसह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर डहाकेने ते इंजेक्शन महोबियाचे असल्याचे सांगितले तर, महोबियाने यादवकडे बोट दाखवले. यादव किंग्जवे हॉस्पिटलमध्ये कर्मचारी होता. परंतु, महोबिया व यादव यांच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. डहाकेतर्फे ॲड. मंगेश मून, महोबियातर्फे ॲड. आर. बी. गायकवाड, यादवतर्फे ॲड. जितेंद्र मटाले तर, सरकारतर्फे ॲड. ज्योती वजानी यांनी कामकाज पाहिले.