विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये आराेपीला दोन वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:07 AM2021-07-23T04:07:50+5:302021-07-23T04:07:50+5:30
नागपूर : सत्र न्यायालयाने गुरुवारी एका आरोपीला अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवून २ वर्षे सश्रम कारावास व ...
नागपूर : सत्र न्यायालयाने गुरुवारी एका आरोपीला अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवून २ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्या. के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला.
लेशकुमार लीलाधर गोखले (२५) असे आरोपीचे नाव असून तो आंबेडकरनगर येथील रहिवासी आहे. आरोपीने विवाहित असताना हे कुकृत्य केले. घटनेच्या वेळी पीडित मुलगी केवळ १२ वर्षे वयाची होती. आरोपीचे मुलीच्या घरी जाणे-येणे होते. तो मुलीच्या वडिलाला विविध कामात मदत करीत होता. दरम्यान, मुलीच्या घरी कुणीच नसताना आरोपी चाकूचा धाक दाखवून तिच्यासोबत लैंगिक चाळे करीत होता. आरोपीने ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे मुलगी अनेक दिवस गप्प होती. १० एप्रिल २०१५ रोजी आरोपीने मुलीवर बलात्कार केला. त्यामुळे मुलीने धाडस करून कुटुंबीयांना आरोपीच्या कुकृत्याची माहिती दिली अशी पोलीस तक्रार होती. तक्रारीनंतर जरीपटका पोलिसांनी आरोपीला १८ एप्रिल रोजी अटक केली होती. परंतु, न्यायालयामध्ये बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. सरकारच्यावतीने ॲड. श्याम खुळे व ॲड. शाहजा शेख यांनी कामकाज पाहिले.