उसरे हत्याकांडातील आरोपींना २४ पर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 00:30 IST2020-08-18T00:29:42+5:302020-08-18T00:30:52+5:30
सदर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या हत्याकांडातील आरोपींना न्यायालयाने वेगवेगळ्या मुदतीची पोलीस कोठडी मंजूर केली. काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची हत्या करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

उसरे हत्याकांडातील आरोपींना २४ पर्यंत पोलीस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या हत्याकांडातील आरोपींना न्यायालयाने वेगवेगळ्या मुदतीची पोलीस कोठडी मंजूर केली. काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची हत्या करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर हुडकेश्वरमधील चेतन मेटांगळे यांची हत्या करणाऱ्या आरोपींना २३ ऑगस्टपर्यंत पीसीआर मंजूर केला.
काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची रविवारी सकाळी सदरमधील भारत टॉकीजजवळ आरोपी जेरॉन ऊर्फ बंटी जॉर्ज ऊर्फ सेबिस्टियन निकोलस आणि जतीन ऊर्फ जय जंगम या दोघांनी चाकू तसेच कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केली होती. सदर पोलिसांनी दोन्ही आरोपींना रविवारी सायंकाळी अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००९ मध्ये उसरे यांनी घराच्या बाजूला दुसरे घर विकत घेतले होते. तेथे आरोपी राहत होता. आरोपी घर रिकामे करून देण्यास तयार नव्हता. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. तीन दिवसांपूर्वी उसरे आणि आरोपींमध्ये भांडण झाले होते. त्यामुळे आरोपींनी संगनमत करून त्यांची हत्या केली. आरोपींनी या कटकारस्थानाची कुणाला माहिती दिली का, त्यांचे कुणी साथीदार आहेत का, त्यांनी शास्त्र कुठून आणले, आदी मुद्यांचा तपास करायचा असल्यामुळे त्यांचा पीसीआर मिळावा अशी मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आरोपींना २४ ऑगस्टपर्यंत पीसीआर मंजूर केला.
दुसरी अशीच घटना शनिवारी रात्री हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उदयनगर चौकाजवळ घडली होती.
कार पार्किंगच्या वादातून आरोपी बादल नेताम, नीलेश गेडाम, रोशन धुर्वे आणि त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी चेतन मेटांगळे या तरुणाची निर्घृण हत्या केली होती. हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी नेताम, गेडाम आणि धुर्वे या तिघांना न्यायालयात हजर करून त्यांचा २३ ऑगस्टपर्यंत पीसीआर मिळवला. तर, अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.