तेलंगणात हत्या करून फरार झालेला आरोपी रेल्वेस्थानकावर सापडला, रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई
By नरेश डोंगरे | Published: October 18, 2022 07:30 PM2022-10-18T19:30:13+5:302022-10-18T19:30:24+5:30
आरोपीला तेलंगणा पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले.
नागपूर : आपल्या मित्राची हत्या करून तेलंगणातून फरार झालेल्या एका आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) गुन्हे शाखेने नागपूर स्थानकावर सोमवारी जेरबंद केले. राजकुमार रामसूरत साहनी (वय ४७) असे त्याचे नाव आहे. रात्री त्याला तेलंगणा पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
मुळचा गोरखपूर (उत्तरप्रदेश) मधील रहिवासी असलेला साहनी त्याच्या काही मित्रांसह तेलंगणामधील आसिफनगर (पोलीस स्टेशन सिकंदराबाद) येथे पेंटींगचे काम करीत होता. दोन दिवसांपूर्वी दारूच्या नशेत त्याचे मित्रासोबत भांडण झाले. त्यानंतर आरोपी साहनी याने त्याच्या साथीदाराची हत्या केली आणि फरार झाला. तो ट्रेन नंबर १२७२१ दक्षिण एक्स्प्रेसने उत्तर प्रदेशकडे जात असल्याचे लक्षात येताच ही माहिती तेलंगणा पोलिसांनी नागपूरच्या आरपीएफला कळवली. त्यावरून आरपीएफचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांनी आपल्या सहकाऱ्यांना लगेच त्या आरोपीच्या मुसक्या बांधण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार, पोलीस निरीक्षक मीना यांच्या नेतृत्वात एएसआय अश्विन पवार, ब्रिजेश कुमार, ललित गुर्जर, नीरज कुमार दीपचंद पटेल, उर्मिला शर्मा, तसेच गुन्हे शाखेचे नवीन कुमार सिंह, एएसआय मुकेश राठौड, राजकुमार भारती, जसवीर सिंह, अजय सिंह, श्याम झाडोकर, कामसिंह ठाकूर, सैयद आबिद यांच्या चमूने सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास फलाट क्रमांक एकवर दोन्ही बाजूने सापळा लावला. दक्षिण एक्स्प्रेस फलाटावर येताच प्रत्येक डब्यात आरपीएफच्या पथकाने आरोपीची शोधाशोध केली. ते पाहून आरोपी साहनी डब्यातून पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करून आरपीएफच्या चमूने त्याच्या मुसक्या बांधल्या.
त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याची चाैकशी करण्यात आली. प्राथमिक चाैकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे तेलंगणा पोलिसांना त्याच्या अटकेची माहिती कळविण्यात आली. त्यानुसार, सिकंदराबादचे पोलीस पथक सोमवारी रात्री नागपुरात पोहचले. त्यांनी आरोपी साहनीला ताब्यात घेतले. रात्री उशिरा हे पोलीस पथक साहनीला घेऊन सिकंदराबादकडे रवाना झाले.