नागपूरमध्ये मोबाईलचे दुकान फोडणारे आरोपी गजाआड
By योगेश पांडे | Published: July 9, 2023 05:30 PM2023-07-09T17:30:18+5:302023-07-09T17:30:38+5:30
३ जुलैच्या रात्री अश्वीन वाघमारे (३५) यांचे जवाहरनगर येथील मोबाईलचे दुकान चोरट्यांनी फोडले व त्यातून २.५५ लाखांचे २४ मोबाईल लंपास केले.
नागपूर : मोबाईलचे दुकान फोडून दोन डझन नवेकोरे मोबाईल चोरणाऱ्या आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचादेखील समावेश आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली आहे.
३ जुलैच्या रात्री अश्वीन वाघमारे (३५) यांचे जवाहरनगर येथील मोबाईलचे दुकान चोरट्यांनी फोडले व त्यातून २.५५ लाखांचे २४ मोबाईल लंपास केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला व तपास सुरू होता.
सीसीटीव्ही व इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला असता शेख आरीफ शेख शाकीर (२३, ठाकूर प्लॉट, मोठा ताजबाग) हा या चोरीत सहभागी असल्याची बाब समोर आली. त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने पियुष पंकज कांबळे (१९, कैलास नगर) व रजत आनंद गोंडाने (१९, सावित्रीबाई फुले नगर) तसेच एका अल्पवयीन मुलासह चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींनी दोन मोबाईल मोहम्मद तौसिफ मोहम्मद वाहीद छव्वारे (२४, खरबी) याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली व त्यांच्या ताब्यातून २३ मोबाईल, बॅग, तीनचाकी ऑटो असा ३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.