शेजाऱ्याचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: May 24, 2023 04:44 PM2023-05-24T16:44:57+5:302023-05-24T16:45:32+5:30
मौदा तालुक्यामधील घटना
नागपूर : अंगणाच्या जागेवरून वाद झाल्यानंतर शेजाऱ्याचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीला बुधवारी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायालयाचे न्या. गणेश देशमुख यांनी हा निर्णय दिला. ही घटना मौदा तालुक्यातील आहे.
मुरलीधर कानोजी ढोमणे (४३) असे आरोपीचे नाव असून, तो रेवराल, ता.मौदा येथील रहिवासी आहे. मृताचे नाव दिगंबर जागोबा घुले (५२) होते. ढोमणे व घुले यांची घरे एकमेकांना लागून आहेत. त्यांच्यामध्ये अंगणाच्या जागेवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्या संदर्भात गावातील तंटामुक्ती समिती व सरपंचाकडे तक्रारीही केल्या गेल्या होत्या. ८ एप्रिल, २०२० रोजी रात्री या दोघांचे नेहमीप्रमाणे भांडण झाले. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी ७ च्या सुमारास ढोमणेने घुलेला लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यामुळे घुलेच्या तोंडाला, डोक्याला व छातीला गंभीर मार लागला. परिणामी, तो मरण पावला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड.अभय जिकार यांनी कामकाज पाहिजे. त्यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब व इतर ठोस पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.