पत्नीवर पतीपुढेच बलात्कार करणाऱ्या आरोपीची २० वर्षे कारावासाची शिक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:11 AM2021-09-07T04:11:11+5:302021-09-07T04:11:11+5:30

नागपूर : पत्नीवर पतीपुढेच सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींपैकी एक शंकर ऊर्फ शेखर देवराव मुंढे याची २० वर्षे सश्रम कारावास ...

Accused who raped his wife in front of her husband was sentenced to 20 years imprisonment | पत्नीवर पतीपुढेच बलात्कार करणाऱ्या आरोपीची २० वर्षे कारावासाची शिक्षा कायम

पत्नीवर पतीपुढेच बलात्कार करणाऱ्या आरोपीची २० वर्षे कारावासाची शिक्षा कायम

Next

नागपूर : पत्नीवर पतीपुढेच सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींपैकी एक शंकर ऊर्फ शेखर देवराव मुंढे याची २० वर्षे सश्रम कारावास व इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.

ही घटना अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलिसांच्या हद्दीत घडली. या प्रकरणात दोन आरोपी असून, दुसरा आरोपी आशिष ऊर्फ दुब्या फरार आहे. २७ एप्रिल २०१८ रोजी सत्र न्यायालयाने शंकर मुंढेला २० वर्षे सश्रम कारावास व २६ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध मुंढेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील ठोस पुरावे लक्षात घेता, सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून मुंढेचे अपील फेटाळून लावले.

पीडित दाम्पत्य शेतमजूर असून, ते शेतातील झोपडीत राहात होते. जानेवारी-२०१६ मध्ये आरोपी शेखर मुंढे बोअरवेल खोदण्याच्या कामासाठी शेतात आला होता. तो बलात्कार पीडित पत्नीच्या अवतीभोवती घुटमळत होता. त्यामुळे त्याला शेतात येण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०१६ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास दोन्ही आरोपी शेतात आले. दुब्याने पतीच्या गळ्याला चाकू लावून त्याचा मोबाईल हिसकावला तर, मुंढेने पत्नीकडे धाव घेऊन तिच्यावर पतीपुढेच बलात्कार केला. त्यानंतर मुंढेने पतीवर चाकू धरला आणि दुब्याने बलात्कार केला. याशिवाय दोन्ही आरोपींनी शेतीचे साहित्य चोरून पळ काढला. पोलिसांनी मुंढेला ८ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात यश मिळविले. परंतु, दुब्या अद्याप गवसला नाही.

--------------

दुब्याविरुद्धचे प्रकरण प्रलंबित

सत्र न्यायालयाने फरार आरोपी आशिष ऊर्फ दुब्याविरुद्धचे प्रकरण प्रलंबित ठेवले आहे. दुब्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. दुब्याला अटक झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध स्वतंत्र खटला चालवला जाईल.

Web Title: Accused who raped his wife in front of her husband was sentenced to 20 years imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.