दीड लाखांच्या सिगारेट चोरी करणारा आरोपी सीसीटीव्हीमुळे अटकेत
By योगेश पांडे | Published: March 3, 2024 06:10 PM2024-03-03T18:10:07+5:302024-03-03T18:10:58+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने ही कारवाई केली.
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : एका किराणा दुकानातून तब्बल दीड लाखांच्या सिगारेट चोरणाऱ्या आरोपीला सीसीटीव्हीमुळे अटक करण्यात यश आले. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने ही कारवाई केली.
रेवाचंद हीरदोमन परसबानी (६८, सिंधी कॉलनी, खामला) यांचे आनंद टॉकीज जवळ जगदीश किराणा स्टोअर्स नावाचे दुकान आहे. त्यांनी २६ फेब्रुवारी रोजी गांधीबागेतून १.५१ लाख किंमतीचे सिगारेटचे बॉक्स आणले. दुकानात गर्दी असल्याने त्यांनी सिगारेटचे बॉक्स दुकानाबाहेरच ठेवले होते. अज्ञात चोरट्याने ते बॉक्स लंपास केले. धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा गुन्हे शाखेकडूनदेखील तपास सुरू होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू केला. त्यातून अरुण कृष्णकुमार डोये (३६, आमगाव, गोंदिया) याच्यावर संशय आला.
त्याला जुना ईमामवाडा येथील त्याच्या घरातून ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या घरातून ४७ सिगारेटचे बॉक्स जप्त करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक गजानन चांभारे, प्रविण सोनेने, मनोज राऊत, नरेश तुमडाम, कमलेश गणेर, गजानन कुबडे, आशीष धंदरे, सुरेश तेलेवार, सुनिल कुंवर, विवेक झिंगरे, अनंता यांच्या पथकाने ही कारवाई केली.