दारूच्या पैशांवरून मित्राचा जीव घेणाऱ्या आरोपींना सव्वा महिन्याने अटक
By योगेश पांडे | Published: March 12, 2024 04:43 PM2024-03-12T16:43:02+5:302024-03-12T16:43:07+5:30
पोलिसांनी या प्रकरणात आरोपी दत्तूला लगेच अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सुरूच होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे मित्राचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
मंगेश गणेश मेंढे (४५, उन्नती कॉलनी, समतानगर, नारी रोड कपिलनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. २ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. मंगेश मेंढे हे रेतीचा व्यवसाय करायचे. त्यांची आरोपी दत्तू उर्फ दत्त्या राहुल रमेश रामटेके (१९, मानवनगर, टेकानाका) सोबत मैत्री होती. दत्तू अनेकदा त्यांच्याकडे कामालाही जात होता. २ फेब्रुवारी रात्री अकरा वाजता मंगेश मेंढे हे टेकानाका जवळून जात होते. तेथे दत्तू त्यांना भेटला. त्याच्यासोबत इतरही साथीदार होते. त्यांनी मंगेश यांना ‘मुझे दारू पिने को पैसे देने पडेंगे’ असे म्हटले. परंतु मंगेश यांनी पैसे दिले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या दत्तूने आपल्या जवळील चाकू काढून मंगेश यांच्या डाव्या बाजूला छातीवर तीन वार केले. यात मंगेश हे गंभीर जखमी झाले व दवाखान्यात पोहोचण्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणात आरोपी दत्तूला लगेच अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सुरूच होता. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता यात दत्तूसोबत आणखी आरोपी असल्याची बाब समोर आली. खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून पोलिसांनी ऋषभ उर्फ ददु सुभाष चाफेकर (२३, आवळे नगर, टेकानाका) , हर्षदीप उर्फ वारल्या लक्ष्मण नगरारे (३०, कपीलनगर), ईरषाद उर्फ नौषाद शौकत अली (२७, सहयोग नगर), संतोष उर्फ पापा गौरी नक्के (३४, पॉवरग्रिड चौक), सतिश गौरी नक्के (३७, पॉवरग्रीड चौक), मोहम्मद बिलाल कासीम अंन्सारी (३८, कामगार नगर) यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी सोबत कट रचून मंगेश यांची हत्या केल्याची बाब कबूल केली.