संमोहित करून दागिने लुटणारे आरोपी पोहोचले घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:08 AM2021-07-31T04:08:16+5:302021-07-31T04:08:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संमोहित करून महिलांचे दागिने लुटणारे आरोपी आता घरातही पोहचू लागले आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संमोहित करून महिलांचे दागिने लुटणारे आरोपी आता घरातही पोहचू लागले आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ आणि २८ जुलैला त्यांनी राशीचे खडे विकण्याच्या बहाण्याने दोन वेगवेगळ्या महिलांच्या घरात शिरून महिलांचे सुमारे अडीच लाखांचे दागिने लुटून नेले.
अजनीतील निलोफर नासिर खान (वय२८) यांच्याकडे राशीचे खडे विकण्याच्या बहाण्याने २३ जुलैला दोन भामटे आले. त्यांनी निलोफर यांचा हात पाहून काय केले कळायला मार्ग नाही. त्या भान हरपल्यासारख्या झाल्या. आरोपींनी त्यांना तुमच्या मागे ग्रहण लागले आहे, अशी भीती दाखवली. ते सोडवण्यासाठी तुमच्या घरातील सर्व दागिने मातीच्या माठात ठेवा, असे ते म्हणाले. त्यानुसार निलोफर यांनी घरातील सोन्याचे दागिने माठात ठेवले. आरोपींनी ते एका कागदात गुंडाळण्याचा भास निर्माण करून कागदाची एक पुडी निलोफर यांना कंबरेत बांधण्यास सांगितली. आरोपी निघून गेल्यानंतर निलोफर यांनी ती पुडी उघडून बघितली असता त्यात छोटे दगड आढळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी घरच्यांना सांगून नंतर अजनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. अशाच प्रकारे दुसरी घटना सिरसपेठमध्ये २८ जुलैला सकाळी घडली. तशाच दोन भामट्यांनी मीरा तुरकेल यांचे १ लाख, ५९ हजारांचे दागिने चोरून नेले. या दोन्ही प्रकरणांत निलोफर तसेच तुरकेल यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
---
दोन आठवड्यांपासून टोळी सक्रिय
हे भामटे संमोहित करणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचा संशय आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ही टोळी सक्रीय झाली असून, त्यांनी कळमन्यातील सासू-सून तसेच यशोधरानगरातील एका महिलेचे सोन्याचे दागिने संमोहित करून रस्त्यावरूनच लंपास केले. आता ते घरातही शिरू लागल्याचे अजनीच्या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
----