आरोपीची नागपुरमधून कोलकाताला रवानगी
By admin | Published: March 10, 2017 02:52 AM2017-03-10T02:52:03+5:302017-03-10T02:52:03+5:30
सात कोटींच्या बेहिेशेबी मालमत्तेप्रकरणी ताब्यात असलेल्या आरोपीच्या आईचे निधन झाल्याची वार्ता कळताच सीबीआयच्या पथकाने या आरोपीला गुरुवारी रात्री नागपूरहून कोलकाता येथे नेले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 10 - सात कोटींच्या बेहिेशेबी मालमत्तेप्रकरणी ताब्यात असलेल्या आरोपीच्या आईचे निधन झाल्याची वार्ता कळताच सीबीआयच्या पथकाने या आरोपीला गुरुवारी रात्री नागपूरहून कोलकाता येथे नेले.
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी कोलकाता येथील हवाला व्यापारी आहे. त्याच्याविरुद्ध इडीने कारवाई केली होती. नंतर हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. त्यानंतर दोन दिवसांपुर्वी तपास पथक आरोपीला चेन्नईला नागपूर मार्गे घेऊन जात होते. बुधवारी रात्री तपास अधिका-याला एक फोन आला. आरोपीच्या आईचे निधन झाल्यामुळे त्याला कोर्टाने कोलकाता येथे त्याच्या आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची अनुमती दिल्याचे त्यात सांगण्यात आले. त्यामुळे चेन्नईला न जाता आरोपीला नागपुरातच थांबवण्यात आले. त्यानंतर दिल्लीचे विशेष पथक गुरुवारी नागपुरात पोहचले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन नागपूर विमानतळावरून कोलकाता येथे (दिल्लीमार्गे) नेले. या घटनेच्या संबंधाने उलटसुलट चर्चा पसरल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. विमानतळावरही रात्री अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला होता. या संबंधाने वारंवार संपर्क करूनही पोलीस अथवा अन्य यंत्रणांकडून विस्तृत माहिती उपलब्ध झाली नाही.