आरोपी मित्राचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: May 14, 2015 02:45 AM2015-05-14T02:45:15+5:302015-05-14T02:45:15+5:30
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंगणा मार्गावरील राय टाऊन सिटीच्या टेरेसवर अडीच वर्षांपूर्वी झालेल्या एका काश्मिरी विद्यार्थ्याच्या रहस्यमय खूनप्रकरणी
नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंगणा मार्गावरील राय टाऊन सिटीच्या टेरेसवर अडीच वर्षांपूर्वी झालेल्या एका काश्मिरी विद्यार्थ्याच्या रहस्यमय खूनप्रकरणी मृताच्याच मित्राने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
अनिलकुमार ऊर्फ लड्डू ब्रिजनारायण पांडे (२०), असे आरोपीचे नाव असून तो बिहार राज्याच्या कटिहार जिल्ह्यातील मुनियाहारी येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो आणि त्याचा भाऊ सुमित हे पोलीसनगर येथील मंजू सिंग यांच्या घरी भाड्याने राहत होते.
योगेश ऊर्फ बिनू रोशनलाल बगाती, असे मृताचे नाव असून तो आनंदनगर बोहरी जम्मू (काश्मीर) येथील रहिवासी होता. रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा तो विद्यार्थी होता आणि अनंतनगर येथे भाड्याने राहत होता. तो स्वत:च्या खोलीत कमी आणि अधिक काळ पांडे यांच्या खोलीतच राहायचा.
काय झाले असेल
त्या काळ रात्री
घटनेच्या आदल्या दिवशी १५ नोव्हेंबर २०१२ रोजी योगेश हा दिवसभर पांडे बंधूंसोबत त्यांच्या खोलीवर होता. रात्री १०-१२ वाजता खोलीवर पार्टी झाली. पार्टीत मृत, अनिल पांडे, त्याचा भाऊ सुमित, त्यांचे मित्र दीपक ऊर्फ बादशहा बुक्कर, अमित आनंद झा, कुंदनसिंग आणि अॅक्टर नावाचा मित्र सहभागी झाले होते. पार्टीत देशी दारू झोडण्यात आली होती. मेसमधून येणाऱ्या टिफीनमधून सर्वांनी जेवण केले होते. पार्टीत सहभागी असलेल्या कुंदनसिंग याचे खोलीबाहेर राकेश ऊर्फ राका याच्याशी भांडण झाले होते. राकाने कुंदनसिंगला हातबुक्कीने मारपीट केली होती. मृत योगेश आणि बादशहा याने भांडण सोडवले होते. त्यानंतर १६ नोव्हेंबरच्या रात्री १२.३० वाजता मृताने प्रेयसीला भेटायला जातो, असे सांगून रोजच्या प्रमाणे पांडे यांच्या खोलीच्या दाराला बाहेरून लॉक करून तो बादशहाच्या गाडीवर अॅक्टरसह ट्रिपल सिट बसून तेथून निघाला होता. अमित झा हा वेगळ्या गाडीवर होता, असे सुमीत पांडे याचे म्हणणे असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. दुपारी १२.३० वाजता मृताच्या प्रेयसीने अनिल पांडे याला योगेश बेहोश पडल्याची माहिती फोनवर दिली होती. अनिल, सुमित आणि कुंदन यांनी टेरेसवर जाऊन पाहिले असता तो मृतावस्थेत आढळला होता. पोलीस वारंवार अनिल आणि सुमितला चौकशीसाठी बोलावत असून ते येण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यातच अनिलने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. तो फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे, आरोपीच्या वतीने अॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
व्हाईटनर आले कसे ?
योगेश हा १६ नोव्हेंबर २०१२ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हिंगणा मार्गावरील राय टाऊन विंग बी/१ च्या टेरेसवर मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या तोंडावर व्हाईटनर लागलेली प्लास्टिकची पन्नी होती. बाजूला बीअरच्या दोन रिकाम्या बाटल्या आणि व्हाईटनरच्या रिकाम्या बाटल्या होत्या. पँटच्या खिशात राखडीसारखे दिसणारे पावडर होते. मृताचा मित्र अनिलकुमार पांडे याच्या तक्रारीवरून त्याच दिवशी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
विषाबाबत संभ्रम
योगेशचे शवविच्छेदन मेडिकल कॉलेज इस्पितळात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूमार्फत करण्यात आले होते. प्रारंभी मृत्यूच्या कारण संदर्भातील अभिप्राय राखून ठेवण्यात आला होता. त्यानंतर विषाने मृत्यू, असे कारण नमूद करण्यात आले होते. पुढे व्हिसेरा परीक्षण अहवालानुसार व्हिसेरा आणि रक्तात कोणतेही विष आढळून आले नसल्याचा अभिप्राय देण्यात आला होता.
अन् थेट गाठले सर्वोच्च न्यायालय
दरम्यान मृत योगेशचे वडील रोशनलाल बगाती यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दयेची याचिका दाखल केली होती. ही याचिका नागपूर खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली होती. २४ मार्च २०१५ रोजी सुनावणी होऊन न्यायालयाने गुन्हा दाखल करून सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. २७ मार्च रोजी गुन्हे शाखेला प्रकरण प्राप्त झाले. दरम्यान चौकशीवर समाधान न झाल्याने मुलाच्या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त करणाऱ्या तक्रारी रोशनलाल बगाती यांनी पोलिसांकडे केल्या होत्या.
अखेर खुनाचा गुन्हा दाखल
६ एप्रिल २०१५ रोजी खुद्द सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांनी नोंदवलेल्या प्रथम खबरी अहवालावरून अज्ञात आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. राय टाऊनमध्येच योगेशची प्रेयसी राहत होती. याच टाऊनच्या टेरेसवर तो मृतावस्थेत आढळला होता.