नागपुरात शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्यांची धुलाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 08:51 PM2018-07-28T20:51:09+5:302018-07-28T20:55:09+5:30
शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या तिघांना पकडून संतप्त जमावाने बेदम चोप दिला. त्यानंतर त्यांना लकडगंज पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी सायंकाळी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या तिघांना पकडून संतप्त जमावाने बेदम चोप दिला. त्यानंतर त्यांना लकडगंज पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी सायंकाळी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. विशेष म्हणजे, मुलींचे वय १३ वर्षे आहे तर आरोपींमध्ये एक ४० वर्षांचा आहे.
तक्रार करणारी मुलगी (वय १३) तिच्या दोन वर्गमैत्रिणींसोबत शाळा आटोपून शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घराकडे निघाली. गंगाबाई घाट रोड, टाईल्सच्या दुकानासमोर आरोपी सिध्दार्थ ऊर्फ मढ्या शिवदास रामटेके (वय २०), रणजित प्रेमदास माटे (वय ४०) आणि सौरभ रामाधार यादव (वय २०) हे तिघे दुचाकीने मुलींच्या मागे आले. तुम्ही आमच्या गाडीवर बसल्या नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन आरोपींनी त्यांच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. मुलींनी आरडाओरड केल्याने आजूबाजूची मंडळी धावून आली. त्यांनी तिन्ही आरोपींना पकडून त्यांची बेदम धुलाई केली. त्यानंतर त्यांना लकडगंज पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
आरोपींपैकी एक सराईत गुन्हेगार
अटक करण्यात आलेले आरोपी घटनेच्या वेळी दारूच्या नशेत टून्न होते. आरोपी रामटेके हा गुन्हेगारी वृत्तीचा असून, यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे लकडगंज पोलीस सांगतात.