आरोपीचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला
By admin | Published: February 8, 2017 03:03 AM2017-02-08T03:03:34+5:302017-02-08T03:03:34+5:30
शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती बोरकर यांचा खून आणि त्यांचे पती अनिल पांडुरंग बोरकर
सत्र न्यायालय : आरती बोरकर खून प्रकरण
नागपूर : शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती बोरकर यांचा खून आणि त्यांचे पती अनिल पांडुरंग बोरकर यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी एका आरोपीने दाखल केलेला दोषमुक्त (डिस्चार्ज) करण्याचा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
रवींद्र महादेवराव खंते, असे आरोपीचे नाव आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाईक तलाव परिसरातील लालगंज राऊत चौकात १ आॅगस्ट २०१४ रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास आरती बोरकर यांचा खून आणि त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते अनिल पांडुरंग बोरकर यांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
प्रकरणाची पार्श्वभूमी अशी, आरती बोरकर आणि अनिल बोरकर यांनी नाईक तलाव परिसरात असलेला रवींद्र खंते आणि अनिता रवींद्र खंते यांचा रॉकेल व रेशन धान्य विक्रीचा व्यवसाय बंद पाडला होता. खंते दाम्पत्य हे बेकायदेशीर व्यवसाय करतात, अशा तक्रारी बोरकर दाम्पत्य करायचे. खंते यांचा रॉकेलचा डेपोही त्यांनी बंद पाडला होता. याशिवाय सुरेंद्र राधेश्याम केशरवानी, नरेंद्र राधेश्याम केशरवानी आणि सोनू नरेंद्र केशरवानी हे मिरची पावडरमध्ये भेसळ करतात, अशी तक्रार करून त्यांची मिरची पावडरची चक्कीही बोरकर दाम्पत्याने बंद पाडली होती.
केशरवानी आणि खंते यांनी आपसात कट रचून बोरकर दाम्पत्याला ठार मारण्यासाठी आरोपी विशाल ऊर्फ शानू मोहनदास खरे, विक्की राजू खरे आणि आकाश कमलेश दोरखंडे यांना चार लाखांची सुपारी दिली होती. घटनेच्या दिवशी बोरकर दाम्पत्य हे आपल्या घरासमोर बोलत उभे असताना आरोपी आकाश, विक्की आणि विशाल, असे तिघे एमएच-३१-टीसी-४६० क्रमांकाच्या मॅस्ट्रोने आले होते. आकाशने धारदार शस्त्राने अनिल बोरकर यांच्या मानेवर वार करून गंभीर जखमी केले होते. अनिता बोरकर या आपल्या पतीला वाचविण्यास धावल्या असता विक्कीने त्यांच्या छातीवर भोसकून त्यांचा जागीच खून केला होता.
या प्रकरणात एकूण आठ आरोपी असून त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे आहेत. त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आरोपी रवींद्र खंते याचा दोषमुक्तीची विनंती करणारा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकार पक्षाकडून करण्यात आला. तो ग्राह्य ठरवून न्यायालयाने आरोपीचा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील अजय निकोसे यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)