आचार्यश्रींच्या विचारांनी शक्ती मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:50 AM2017-10-07T01:50:27+5:302017-10-07T01:50:44+5:30
जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांचे विचार समजून घेतल्याने दोन पावले पुढे चालण्याची शक्ती मिळाली, असे भावोद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांचे विचार समजून घेतल्याने दोन पावले पुढे चालण्याची शक्ती मिळाली, असे भावोद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले.
रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात अण्णा हजारे यांनी आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची शुक्रवारी सकाळी भेट घेतली. त्यांच्यात सुमारे अर्धा तास विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी बोलताना या ठिकाणी आल्याने शक्ती मिळाल्याचे सांगितले. सोबतच अलीकडे एअर कंडिशनमध्ये झोपेच्या गोळ्या घेऊनही श्रीमंतांना झोप येत नाही. चांगले जीवन जगण्यासाठी आत्मिक समाधान महत्त्वाचे आहे, असेही हजारे म्हणाले. स्वदेशी, सेंद्रीय शेती, आरोग्य सुविधा, शिक्षण याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
खादीमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याची क्षमता असल्याने या उद्योगाला चालना मिळणे आवश्यक आहे, असे आचार्यश्री विद्यासागरजी महाराज म्हणाले.
स्वदेशी, भ्रष्टाचार, खादी, सेंद्रीय शेती, खेड्यांची अर्थव्यवस्था, आरोग्य, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा यावर आचार्य विद्यासागरजी महाराज आणि अण्णा हजारे यांच्यामध्ये गांभीर्याने चर्चा झाली. यावेळी अण्णा हजारे यांना खादीची वस्त्रे देऊन सत्कार करण्यात आला. अमितभाई यांनी मध्यप्रदेशातील खादी उद्योगाविषयी अण्णा हजारे यांना माहिती दिली. मध्यप्रदेशात खादीचे ५० उद्योग उभारण्यात आले असून अशिक्षित आणि ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला. तेथील शाळांमध्येही खादीच्या कापडांचा वापर गणवेश म्हणून करण्यात येतो, असे सांगितले.
विद्यार्थिनींच्या प्रश्नांना उत्तरे
आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांच्याशी चर्चा केल्यानंतर जैन मंदिर परिसरात चालविल्या जाणाºया प्रतिभास्थळी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींसोबत अण्णांनी चर्चा केली. तसेच विद्यार्थिनींच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांना मार्गदर्शनही केले. अण्णा म्हणाले, शेजारी, गाव, देश या सर्वांच्या बाबतीत जो चांगला विचार करतो, असा माणूस निर्माण करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. खोटे बोलू नका अशाप्रकारचे संस्कार मला माझ्या आईकडून मिळाले. मानवसेवा हीच माधवसेवा आहे. निष्काम सेवा करा. मी लग्न केले नाही तरी माझा परिवार मोठा आहे.
भ्रष्टाचार केव्हा संपेल?
विद्यार्थिनींशी चर्चा करताना एका विद्यार्थिनीने देशातील भ्रष्टाचार केव्हा संपेल, असा प्रश्न अण्णांना केला. त्यावर अण्णा म्हणाले, भ्रष्टाचाराची पाळेमुळे खूप खोल आणि मजबूत आहे. ते संपविणे अशक्य आहे. परंतु गेल्या काही आंदोलनांमुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे, हे वास्तव आहे. इंडिया कधी भारत होईल या प्रश्नाच्या उत्तरात स्वत:पासून सुरुवात करा नक्कीच देश भारत होईल, असे उत्तर अण्णांनी दिले. आम्ही देशासाठी काय करू शकतो, असा प्रश्न विद्यार्थिनीने विचारताच अण्णा म्हणाले, तुम्ही विद्यार्थी आहात तेव्हा प्रामाणिकपणे अभ्यास करा. एखादी आजी स्वत: उठून पाणी भरू शकत नाही असे निदर्शनास आल्यास तिला एक मटका पाणी भरून आणून द्या, असे सांगितले. गाय हा राष्टÑीय प्राणी व्हावा आणि चलनावर गाईची प्रतिमा असावी, असेही अण्णा म्हणाले.