अन्ननलिकेच्या पुनर्जनन प्रयत्नाला यश

By admin | Published: January 11, 2015 12:49 AM2015-01-11T00:49:44+5:302015-01-11T00:49:44+5:30

अन्ननलिकेच्या पुनर्जननच्या (रिजनरेशन) प्रयत्नाला पहिल्यांदाच यश प्राप्त झाले आहे. प्लुरीपोटेंट स्टेम सेल्स म्हणजेच दुसऱ्या पेशींना जन्म देणाऱ्या मूळपेशींमुळे हे शक्य झाले आहे,

Achieve success in the rejuvenation of the esophagus | अन्ननलिकेच्या पुनर्जनन प्रयत्नाला यश

अन्ननलिकेच्या पुनर्जनन प्रयत्नाला यश

Next

कुलविंदर दुवा यांची माहिती : दोन दिवसीय ‘गॅस्ट्रोकॉन-२०१५’ परिषदेला सुरुवात
नागपूर : अन्ननलिकेच्या पुनर्जननच्या (रिजनरेशन) प्रयत्नाला पहिल्यांदाच यश प्राप्त झाले आहे. प्लुरीपोटेंट स्टेम सेल्स म्हणजेच दुसऱ्या पेशींना जन्म देणाऱ्या मूळपेशींमुळे हे शक्य झाले आहे, अशी माहिती अमेरिकेतील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. कुलविंदर दुवा यांनी दिली. मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूरच्या वतीने आयोजित ‘गॅस्ट्रोकॉन-२०१५’ परिषदेला शनिवारपासून सुरुवात झाली. या परिषदेच्या औपचारिक उद्घाटनानंतर ते ‘लोकमत’शी बोलत होते.
डॉ. दुवा म्हणाले, संसर्ग झाल्याने एका इसमाची अन्ननलिका पाच सेंटीमीटरपर्यंत कापावी लागली. अन्ननलिका व पोटाचा आकार कायम ठेवत कापलेल्या जागी स्टेन्थ टाकण्यात आली. चार वर्षांनंतर स्टेन्थच्या जागेवर अन्ननलिकेचे रिजनरेशन झाल्याचे आढळून आले. भारतात अन्ननलिकेचा कॅन्सर वाढत आहे. यात अनेकदा अन्ननलिका कापावी लागते. परिणामी अन्ननलिका आणि स्टमक याच्या मूळ आकारात बदल होतो; शिवाय रुग्णाला अनेक दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते. यात ही पद्धत उपयोगी पडण्याची शक्यता आहे.
‘फॅटी लिव्हर’चा धोका
मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक व या परिषदेचे आयोजन सचिव डॉ. श्रीकांत मुकेवार म्हणाले, लिव्हर (यकृत) स्थूलता (फॅटी) असणे हे सामान्य मानले जाते, परंतु असे नाही. फॅटी लिव्हर कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते. बदलत्या जीवनशैलीमुळे ‘फॅटी लिव्हर’चा आजार बळावत आहे. अत्यंत गभीर यकृतच्या आजाराच्या कारणांपैकी हा आजार समोर आला आहे.
‘फॅटी लिव्हर’ हा आजार रोखता येण्यासारखा आहे. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात केवळ जीवनशैलीत बदल करावा लागतो. नियमित व्यायाम व स्थुलतेवर लक्ष ठेवल्यास हा आजार उद्भवत नाही. भारतात दारूशी संबंधित यकृताचा आजार सर्वाधिक आहे. दारू सेवन करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत महिलांना यकृताचा आजार लवकर होण्याची शक्यता असते. हेपिटायटिस ‘सी’ विषाणुबाधेचा प्रसार भारतात व्यापक प्रमाणात आढळतो.
१०० जणामध्ये प्रत्येक तिसरा व्यक्ती या आजाराने बाधित आहे. कोणत्याही साथीच्या आजारातही देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोगाची लागण होत नाही किंवा रु ग्ण मरत नाही. म्हणूनच हेपिटायटिस ‘सी’ विषाणुबाधा ही भारतातील एक अत्यंत गंभीर आरोग्य समस्या आहे. यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
परिषदेत ९५० डॉक्टरांचा सहभाग
दोन दिवसीय ‘गॅस्ट्रोकॉन’ परिषदेत विदर्भ आणि मध्य प्रदेशातील जवळपास ९५० डॉक्टर सहभागी झाले आहेत. यासोबतच आंतरराष्ट्रीय वक्ते इंग्लंडचे डॉ. जे.बी. दिलावरी, डॉ. कुलविंदर दुवा, पीजीआय चंदीगडचे संचालक डॉ. योगेश चावला. आशियन इन्स्टिट्यूट आॅफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हैदराबादचे संचालक डॉ. डी. नागेश्वर रेड्डी, बलवेव इन्स्टिट्यूट आॅफ डायजेस्टिव्ह सायन्सेसचे मुख्य एन्डोस्कोपिस्ट डॉ. अमित मेदेव, मेदांता इन्स्टिट्यूट, नवी दिल्लीचे गॅस्ट्रोएन्टरोलॉजीचे संचालक डॉ. रणधीर सूद आदींचा समावेश आहे. मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूटच्यावतीने वर्षातून दोनदा अशा परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. मुकेवार यांच्यासह डॉ. वैभव गंजेवार, डॉ. भाऊ राजूरकर, डॉ. शरद देशमुख आणि डॉ. विजय वर्मा आदी सहकार्य करीत आहेत.

Web Title: Achieve success in the rejuvenation of the esophagus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.