जीपीएस घड्याळ वाटण्यापूर्वीच मिळाला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:31 AM2018-05-18T00:31:36+5:302018-05-18T00:31:46+5:30
स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूरला ‘इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेस’चा पहिला क्रमांक घोषित करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने ‘जीपीएस घड्याळ’चा उपक्रम राबविल्याने महापालिकेला हा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप सफाई कर्मचाऱ्यांना या घड्याळच मळालेल्या नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूरला ‘इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेस’चा पहिला क्रमांक घोषित करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने ‘जीपीएस घड्याळ’चा उपक्रम राबविल्याने महापालिकेला हा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप सफाई कर्मचाऱ्यांना या घड्याळच मळालेल्या नाहीत. सफाई कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी कामावर दिसत नाही. शहरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे लागलेले आहेत. असे असतानाही पदाधिकारी मात्र शहर स्वच्छ ठेवण्याबाबत महापालिका कटिबद्ध असून विविध उपक्रम राबविले जात असल्याचा दावा करीत आहेत.
शहरातील सफाई कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने त्यांना जीपीएस घड्याळ देण्याचा निर्णय घेतला होता. आसीनगर झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर नऊ सफाई कर्मचाऱ्यांना या घड्याळाचे वाटप करण्यात आले होते. याचा स्वच्छतेवर चांगला परिणाम झाला होता. सफाई कर्मचारी वेळेवर कामावर येत होते. नेमून दिलेल्या भागात स्वच्छता करीत होते. कर्मचारी कामावर हजर आहे की नाही याची माहिती या घड्याळामुळे मिळत होती. चांगले परिणाम दिसून आल्याने शहरातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना जीपीएस घड्याळ देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार ४५०० स्थायी सफाई कर्मचारी व ऐवजदारांना जीपीएस घड्याळी देण्यासाठी संबंधित कंपनीची नियुक्ती करण्यात आली. या कंपनीला प्रत्येक घड्याळासाठी २१६ रुपये भाडे देण्याचे निश्चित करण्यात आले होते. हा उपक्रम राबविण्यासाठी झोन स्तरावर आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर या घड्याळाचे वाटप करण्यात येणार आहे. तोपर्यंत सफाई कर्मचारी आपल्या मर्जीनुसार काम करण्यास मोकळे आहे. शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे असेच साचून राहणार आहे. असे असूनही महापालिकेला स्वच्छता सर्वेक्षणात ‘इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेस’चा पहिला क्रमांक मिळाल्याने शहरातील नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
स्वच्छतेच्याबाबत मनपा कटिबद्ध
महापालिके तर्फे शहरात विविध उपक्रम राबवून शहराला अधिक स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे असूनही काही ठिकाणी घाण वा कचरा आढळून आलाच तर परिसर स्वच्छ केला जाईल. आम्ही नागपूर शहराला स्वच्छ ठेवण्याबाबत कटिबद्ध आहोत.
वीरेंद्र कुकरेजा, अध्यक्ष स्थायी समिती, महापालिका