घरमालकाचा भाडेकरूवर ॲसिड हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:07 AM2021-06-01T04:07:03+5:302021-06-01T04:07:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामधंदा नसल्याने घर भाडे थकल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर घरमालकाने भाडेकरूवर ॲसिड फेकून त्याला गंभीर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामधंदा नसल्याने घर भाडे थकल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर घरमालकाने भाडेकरूवर ॲसिड फेकून त्याला गंभीर जखमी केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी घरमालक सुदाम योगाजी खोत (वय ४०) याला अटक केली आहे.
आरोपी सुदाम खोत याचे उदयनगर गार्डनसमोर घर आहे. तेथे डोमाजी श्यामरावजी गौरकर (वय ५६) हे भाड्याने राहतात. तीन हजार रुपये प्रति महिना घराचा किराया आहे. लॉकडाऊनमुळे कामधंदे बंद पडल्याने तसेच डोमाजी यांना अर्धांगवायूचा आजार असल्यामुळे चार महिन्यांपासून त्यांची आर्थिक अवस्था फारच वाईट आहे. त्यामुळे ते घरभाडे देऊ शकले नाहीत. त्यावरून आरोपी नेहमीच कुरबुर करायचा. शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आरोपी सुदाम खोत याने भाडेकरू डोमाजी गौरकर यांच्यासोबत घर भाड्यावरून वाद उकरून काढला. बाचाबाचीनंतर आरोपी खोतने डोमाजी यांना काठीने मारून जबर जखमी केले. एवढ्यावरच तो थांबला नाही. तर त्याने प्लास्टिकच्या बाटलीतील ॲसिड डोमाजी त्यांच्या डोक्यावर ओतले. त्यामुळे त्यांचे डोके, डोळे आणि गाल जळला आणि ते गंभीर जखमी झाले. आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि आरोपीला बाजूला सारले. जबर जखमी झालेल्या डोमाजी यांना रुग्णालयात पोहोचवन्यात आले. तेथून माहिती मिळाल्यानंतर हुडकेश्वरचे ठाणेदार प्रताप भोसले यांनी लगेच रुग्णालयात धाव घेतली; मात्र तेव्हा डोमाजी बयान देण्याच्या अवस्थेत नव्हते. रविवारी प्रकृती सुधारल्यामुळे डोमाजी यांनी पोलिसांना बयान दिले. त्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी सुदाम खोत विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
---
सख्खे नाते, तरीही...!
आरोपी सुदाम खोत आणि जखमी डोमाजी गौरकर यांचे रक्ताचे नाते आहे. डोमाजी यांच्या बहिणीचा सुदाम हा मुलगा आहे. अर्थात डोमाजीचा तो भाचा आहे. अर्धांगवायूने पीडित मामांची प्रकृती चांगली नसल्याचे माहीत असूनही केवळ पैशासाठी आरोपीने त्यांच्यावर ॲसिड हल्ला करून त्यांना जबर जखमी केले.
---