३,०६२ खासगी बसेसवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:08 AM2021-02-07T04:08:02+5:302021-02-07T04:08:02+5:30
नागपूर : राज्यात एकाच वेळी विविध ठिकाणी शुक्रवारी रात्री करण्यात आलेल्या खासगी बसेस तपासणी मोहिमेत ३,०६२ बसेसवर कारवाई करण्यात ...
नागपूर : राज्यात एकाच वेळी विविध ठिकाणी शुक्रवारी रात्री करण्यात आलेल्या खासगी बसेस तपासणी मोहिमेत ३,०६२ बसेसवर कारवाई करण्यात आली. यातील २१३ बसेस ताब्यात घेण्यात आल्या. परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेसाठी राज्यातील ५० आरटीओ कार्यालयातील ६२३ मनुष्यबळाची मदत घेण्यात आली. या कारवाईने अनधिकृतपणे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस चालकांचे धाबे दणाणले. रात्रीच्या वेळी करण्यात आलेली आरटीओची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
लांब पल्ल्याच्या मार्गावर रात्रीच्या वेळी खासगी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाची धास्ती कमी होताच, खासगी बसेसची रहदारीही वाढली. यामुळे पुन्हा एकदा खासगी बसेसच्या समस्यांचा पाढा वाचाला जात होता. याची दखल घेत, परिवहन आयुक्तांनी राज्यभर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत तपासणी मोहीम हाती घेतली. विशेष म्हणजे, कारवाईची माहिती इतरांना होऊ नये, म्हणून कारवाईच्या दिवशीच सर्व आरटीओ कार्यालयांना याची माहिती देण्यात आली. तपासणी पथकातील प्रतिअधिकाऱ्याने कमीतकमी ३ खासगी प्रवासी बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. तपासणीत विनापरवाना किंवा परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालविणे, टप्पा वाहतूक करणे, प्रवासी बसमधून अवैधरीत्या मालवाहतूक करणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाइट, वायपर आदींची तपासणी करणे, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर व प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे आदींची पाहणी करण्याचा सूचना होत्या. यात दोषी आढळून आलेल्या ३,०६२ बसेसवर कारवाई तर २१३ बसेस ताब्यात घेण्यात आल्या.
- नागपूर आरटीओकडून ३०२ बसेसवर कारवाई
सर्वाधिक कारवाई ठाणे आरटीओकडून झाली. ५३९ बसेस कारवाई करीत ३२ बसेस ताब्यात घेण्यात आल्या. नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ मिळून ३०२ बसेसवर कारवाई तर १० बसेस जप्त करण्यात आल्या. पुणे आरटीओकडून ४७२ बसेसवर कारवाई करीत ४३ बसेस ताब्यात घेण्यात आल्या. कोल्हापूर आरटीओकडून ३०१ बसेसवर कारवाई करीत १७ बसेस जप्त करण्यात आल्या. नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या मार्गदर्शनात १६४ बसेसवर कारवाई करीत, ५ बसेस जप्त तर शहर आरटीओ कार्यालयाकडून १३८ बसेसवर कारवाई करीत ५ बसेस जप्त करण्यात आल्या.
कोट...
शुक्रवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या खासगी बसेस विशेष तपासणी मोहिमेत परिवहन आयुक्त कार्यालयासह १५ प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा सहभाग होता. जेव्हा आवश्यक असेल, तेव्हा अशा प्रकारच्या ‘ड्राइव्ह’ हाती घेण्यात येईल.
-डॉ.अविनाश ढाकणे
परिवहन आयुक्त
-अशी झाली कारवाई
कार्यालय कारवाई ताब्यात बसेस
मुंबई (सेंटर) ५६ ३
मुंबई (ईस्ट) ५९ ३
मुंबई (वेस्ट) १०८ ३
ठाणे ५३९ ३२
पनवेल २५८ ८
पुणे ४७२ ४३
कोल्हापूर ३०१ १७
लातूर १६३ २५
नांदेड ७० १०
अमरावती २१६ २५
नाशिक १३८ १२
धुळे २०९ ७
औरंगाबाद १४२ १५
नागपूर (शहर) १३८ ५
नागपूर (ग्रामीण) १६४ ५
टीसी ऑफिस २९ ०