वैधमापनशास्त्र विभागाची ५६ विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:46 PM2018-08-28T22:46:55+5:302018-08-28T23:01:47+5:30
ग्राहकांना वजन कमी मिळत असल्याच्या तक्रारीवरून वैधमापनशास्त्र विभागाने सोमवार आणि मंगळवारी चार बाजारपेठांमध्ये कारवाई करून ५६ विक्रेत्यांकडून दंड वसूल केला आहे. ही कारवाई निरंतर सुरू राहणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्राहकांना वजन कमी मिळत असल्याच्या तक्रारीवरून वैधमापनशास्त्र विभागाने सोमवार आणि मंगळवारी चार बाजारपेठांमध्ये कारवाई करून ५६ विक्रेत्यांकडून दंड वसूल केला आहे. ही कारवाई निरंतर सुरू राहणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
चार बाजारपेठांमध्ये कारवाई
लोकमतने सोमवारच्या अंकात ‘मापात पाप, किलोभराची भाजी तीन पाव’ या मथळ्याखाली विक्रेते भाजीपाला वा वस्तूंचे मोजमाप वजनकाट्यात दगड ठेवून करीत असल्याच्या छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली होती. सोमवारी बहुतांश बाजारपेठांमध्ये विक्रेत्यांनी कारवाईच्या भीतीने वजनातून दगड हटविले होते. वैधमापनशास्त्र विभागाच्या निरीक्षकांनी कर्मचाऱ्यांच्या चमूसह कळमना, सदर, कॉटन मार्केट आणि फुले मार्केटमधील विक्रेत्यांच्या वजनाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना विक्रेत्यांकडे दगड दिसून आले नाही, पण नियतकालीन स्टॅम्पिंग न केलेली वजने आढळून आली. सर्व वजने जप्त करून त्यांच्याकडून नियमानुसार दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई निरंतर सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोमवारी व मंगळवारी पावसामुळे आठवडी बाजारात विक्रेते फार कमी होते. त्यानंतरही चार बाजारपेठांमध्ये ५६ विक्रेत्यांवर कारवाई केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वजनकाट्यात दगड ठेवून भाजीपाला वा वस्तूंची मोजमाप करणे कायद्याने गुन्हा आहे. विभागाचे अधिकारी नेहमीच बाजारपेठांची पाहणी करून विक्रेत्यांवर कारवाई करीत असतात. कारवाई करताना वजने जप्त करून त्यांच्याकडून दंडही आकारण्यात येतो. शहराच्या विविध भागात बाजारपेठा आहेत, शिवाय आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांकडून नेहमीच ग्राहकांची फसवणूक करून उल्लंघन करण्यात येते. अशा वेळी ग्राहकांनाही सजग होण्याची गरज आहे. तक्रारीसाठी विभागाने दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर फोन करून ग्राहकांना तक्रार करता येते. तक्रारीची दखल घेऊन संबंधित विक्रेत्याच्या वजनाची पाहणी करण्यात येते. वजनाचे नियतकालीन स्टॅम्पिंग आढळून न आल्यास वजने जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. विभागाने या वर्षात २०० पेक्षा जास्त विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
ग्राहकांची फसवणूक होऊ नये
वजनात ग्राहकांची फसवणूक होऊ नये, याकरिता वैधमापनशास्त्र विभाग नेहमीच दक्ष असतो. वेळोवेळी बाजारपेठांमधील विक्रेत्यांच्या वजनाची पाहणी करण्यात येते. वजनाची नियतकालीन स्टॅम्पिंग न केलेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. सोमवार व मंगळवारी ५६ विक्रेत्यांवर कारवाई केली. ही कारवाई निरंतर सुरू राहणार आहे.
धनवंत कोवे, उपनियंत्रक,
वैधमापनशास्त्र विभाग, नागपूर विभाग.