नागपूर आरटीओत एसीबीची कारवाई : तीन हजाराची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 09:25 PM2019-06-11T21:25:54+5:302019-06-11T21:26:43+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाळे टाकून तीन हजाराची लाच मागणाऱ्या विजय विश्वनाथ हुमणे (वय ५०) नामक लाचखोर एजंटच्या मुसक्या बांधल्या. या कारवाईमुळे आज दिवसभर आरटीओ कार्यालयात भूकंप आल्यासारखे वातावरण होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाळे टाकून तीन हजाराची लाच मागणाऱ्या विजय विश्वनाथ हुमणे (वय ५०) नामक लाचखोर एजंटच्या मुसक्या बांधल्या. या कारवाईमुळे आज दिवसभर आरटीओ कार्यालयात भूकंप आल्यासारखे वातावरण होते.
तक्रारदार व्यक्तीच्या डिओ दुचाकीची कागदपत्रे हरविली होती. त्याची मूळ प्रत मिळविण्यासाठी दुचाकीधारकाने आरटीओच्या गिरीपेठ कार्यालयात संपर्क केला होता. या कार्यालयाच्या आवारात दलाल म्हणून फिरणाऱ्या हुमणेने दुचाकीधारकाला गाठले. तीन हजार रुपये दिल्यास तातडीने कागदपत्रे मिळवून देतो, असे त्याने सांगितले. लाचेची रक्कम साहेबांकडे गेल्याशिवाय काम होत नाही, असे हुमणेने ठणकावून सांगितले होते. दुचाकीधारकाला चकरा मारून त्याची प्रचिती आली होती. त्यामुळे दुचाकीधारकाने लाचेची रक्कम देण्याचे मान्य करून सरळ एसीबीकडे तक्रार नोंदवली. उपअधीक्षक सुनील बोंडे यांनी तक्रार नोंदवून घेतल्यानंतर सापळा लावला. त्यानुसार, मंगळवारी दुपारी १२. ३० च्या सुमारास दुचाकीधारक हुमणेकडे गेला. त्याने ज्या साहेबांना लाच द्यायची आहे, त्यांच्याकडे घेऊन चलण्यास सांगितले. मात्र, हुमणेने त्याला साहेबांकडे नेण्याचे टाळले. आपल्याकडे रक्कम मिळाल्यानंतर साहेबांकडे ती बरोबर पोहचते आणि लाच देणाऱ्याचे कामही होते, असे त्याने सांगितले. त्यानुसार, दुचाकीधारकाने लाचेचे तीन हजार रुपये हुमणेला दिले. हुमणेने ही रक्कम स्वीकारताच बाजूलाच घुटमळणाऱ्या एसीबीच्या पथकाने हुमणेच्या मुसक्या बांधल्या. एसीबीचे उपअधीक्षक श्रीकांत धीवरे, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार, उपअधीक्षक सुनील बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायक रवी डहाट, शिपाई मंगेश कळंबे, मंजुषा बुंधाळे, अस्मिता मेश्राम यांनी ही कामगिरी बजावली.
कारवाईतून इशारा
एसीबीने गेल्या अनेक दिवसानंतर आरटीओ कार्यालयाच्या परिसरात पाय ठेवला. माजी अधीक्षक पाटील यांच्या प्रकरणातून आरटीओ, फॉरेस्ट, महसूल विभागातून एसीबीच्या अधिकाऱ्यांना महिन्याला ५० लाखांची देण येत असल्याचा खळबळजनक खुलासा झाला होता. एसीबीकडून तत्पूर्वी आणि त्याहीनंतर आरटीओच्या कोणत्याच मोठ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली नसल्याने या खुलाशाला बळ मिळाले होते. आजही एजंट पकडला गेला, मात्र ही लाच कोणत्या अधिकाऱ्यासाठी मागण्यात आली होती, तो अधिकारी कारवाईच्या टप्प्यात सापडला नाही. त्यामुळे ही कारवाई म्हणजे आरटीओसाठी इशारा आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.