नागपुरात बनावट आधारकार्डवर प्रवास करणाऱ्या १०५ प्रवाशांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 10:48 PM2019-11-04T22:48:17+5:302019-11-04T23:20:35+5:30
दिवाळीत दलालांनी रेल्वेगाड्यांची सर्व तिकिटे बुक केली. गरजू प्रवाशांकडून अधिक पैसे घेऊन त्यांना बनावट आधारकार्ड पुरविले. परंतु याची माहिती मिळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने गरिबरथ आणि नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमध्ये कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीत दलालांनी रेल्वेगाड्यांची सर्व तिकिटे बुक केली. गरजू प्रवाशांकडून अधिक पैसे घेऊन त्यांना बनावट आधारकार्ड पुरविले. परंतु याची माहिती मिळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने गरिबरथ आणि नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमध्ये कारवाई केली. कारवाईत १०५ प्रवासी बनावट आधारकार्डवर प्रवास करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून १ लाख १७ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय् यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिवाळीच्या काळात सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल राहतात. चार महिन्यांपूर्वी रेल्वेगाडीचे आरक्षण सुरू होते. याचा फायदा घेऊन रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या नागपुरातील १० दलालांनी प्रवाशांकडून अधिक पैसे वसूल करून त्यांना तिकीट पुरविले. यात १२११४ नागपूर-पुणे गरिबरथ एक्स्प्रेसमधील ४४ प्रवाशांना तसेच १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमधील ६१ प्रवाशांना बनावट आधारकार्ड देऊन तिकीट पुरविण्यात आले. दलालांनी तिकीट पुरविल्याची गुप्त माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली. त्यानुसार विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय् यांनी मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या सहकार्याने दोन पथक तैनात केले. यातील एका पथकाने गरिबरथ एक्स्प्रेसमध्ये ४४ प्रवाशांकडे बनावट आधारकार्ड आढळल्यामुळे त्यांच्याकडून ५० हजार ६०० रुपये तसेच १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमधील ६१ प्रवाशांकडे बनावट आधारकार्ड आढळल्यामुळे त्यांच्याकडून ६६ हजार ५०० रुपये असा एकूण १ लाख १७ हजार १०० रुपये दंड वसूल केला. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या १० दलालांविरुद्ध रेल्वे अॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची चौकशी सुरू आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान २७५१ तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणून २३ लाख ७० हजार ४० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय् यांनी दिली. ही कारवाई निरीक्षक गणेश गरकल, उपनिरीक्षक मो. मुगिसुद्दीन, निरीक्षक एस. बी. पगारे, उपनिरीक्षक उषा बिसेन, के. ए. अन्सारी, प्रकाश रायसेडाम, सतीश इंगळे, जी. आर. कोटले, चुन्नीलाल, ईशांत दीक्षित, सुभाष आदवारे, पूनम सांगवाल, संगीता साहू, अमीचंद सैनी, आर. के. गुप्ता, एस. एस. बघेल यांनी पार पाडली.
दलालांना पोलिसांच्या ताब्यात देणार
बनावट आधारकार्ड तयार करून ते प्रवाशांना पुरविणे हा गुन्हा आहे. रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे अॅक्टनुसार कारवाई केली असून, चौकशीनंतर बनावट रेल्वे तिकीट तयार करून ते प्रवाशांना पुरविल्याबद्दल तिकीट दलालांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय् यांनी दिली.