११ प्रतिष्ठानांवर कारवाई : १.२७ लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:10 AM2021-03-04T04:10:33+5:302021-03-04T04:10:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी ११ दुकाने, प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख २७ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी ११ दुकाने, प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान, उपद्रव पथकाने शहरातील एकूण १०२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांनी ही कारवाई केली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत पथकाने ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनअंतर्गत ५ हजार रुपये, हनुमाननगर झोन येथील ४ प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली. परंतु, कुठलाही दंड वसूल करण्यात आला नाही. धंतोली झोनअंतर्गत एकूण २७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरूनगर झोनमधील एकूण १७ प्रतिष्ठाने पथकाने तपासली. गांधीबाग झोन येथील कारवाईत १५ हजार रुपये दंड वसूल केला, सतरंजीपुरा झोनच्या पथकाने ५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २५ हजार दंड वसूल केला, लकडगंज झोनअंतर्गत एकूण १३ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. आशीनगर झोनमध्येही १६ प्रतिष्ठाने तपासली. मंगळवारी झोन येथे शहरातील सर्वाधिक २१ प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली. यात उपद्रव पथकाने २५ हजार दंड वसूल केला.