नागपुरात घाण करणाऱ्या १६०७ संस्थावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 11:11 PM2019-11-05T23:11:38+5:302019-11-05T23:12:42+5:30
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०१९ दरम्यान शहरातील रस्ते, फुटपाथ, मोकळ्या जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या १६०७ संस्थावर कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०१९ दरम्यान शहरातील रस्ते, फुटपाथ, मोकळ्या जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या १६०७ संस्थावर कारवाई करण्यात आली. यात शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅब, मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंग हॉटेल्स, सिनेमागृह, मंगल कार्यालये, कॅटर्स व्यावसायिक आदींचा समावेश आहे. दोषीकडून २१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
उपद्रव शोध पथकाचे स्कॉड लिडर विरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे कारवाई सुरू आहे. शहर विद्रुप करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनपाने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. झोन निहाय पथकाची नेमणूक करण्यात आली असून यात ८७ जणांचा समावेश आहे.
रस्ता, फूटपाथ, मोकळ्या जागेत कचरा टाकणाऱ्या ७७७ शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस यांच्यावर ११ डिसेंबर २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत कारवाई करून ५ लाख ८७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅब आदींमार्फत कचरा टाकून रस्ता, फूटपाथ, मोकळ्या जागांसह सार्वजनिक ठिकाणे विद्रुप करणाऱ्या १२० जणांवर कारवाई करीत १ लाख ९७ हजारांचा दंड वसूल केला. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंग हॉटेल्स, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस अशा ७१० उपद्रवींवर १३ लाख १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तिन्ही कारवायांमधून एकूण २० लाख ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपद्रव शोध पथकाद्वारे देण्यात आली आहे.
तीन झोन कारवाईत आघाडीवर
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याबाबत मंगळवारी, नेहरूनगर व लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक संस्थावर कारवाई करण्यात आली आहे. २०७ शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेसवर मंगळवारी झोनमध्ये कारवाई क रण्यात आली. दवाखाने, इस्पितळे व पॅथलॅब यांच्यावर कारवाई करण्यात नेहरूनगर झोन आघाडीवर आहे. अशा ४८संस्थाकडून दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंग हॉटेल्स, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हीस यांच्यावरील कारवाईत लक्ष्मीनगर झोन अव्वल असून २०४ प्रकरणातून दंड वसूल करण्यात आला आहे.
उपद्रवींची माहिती मनपाला द्या
आपले शहर हिरवे, सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यात नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याकडून कुठलाही उपद्रव होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घ्यावी. तसेच असे काही आढळल्यास त्वरित महापालिकेच्या उपद्रव शोध पथक किंवा स्वच्छता विभागाकडे माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
झोननिहाय करण्यात आलेल्या कारवाया
लक्ष्मीनगर २२७
धरमपेठ १४७
हनुमाननगर १५३
धंतोली ६५
नेहरूनगर १७४
गांधीबाग २१०
सतरंजीपूरा २१
लकडगंज ४२
आसीनगर २८२
मंगळवारी २८६
एकूण १६०७