नागपुरात २११ पीओपी गणेशमूर्ती विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 10:41 PM2019-08-30T22:41:45+5:302019-08-30T22:43:03+5:30
महापालिकेने शुक्रवारी २११ पीओपी गणेशमूर्ती विक्रेत्यांवर कारवाई केली व विक्रेत्यांकडून ८० हजार २०० रुपये दंड वसूल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेने शुक्रवारी २११ पीओपी गणेशमूर्ती विक्रेत्यांवर कारवाई केली व विक्रेत्यांकडून ८० हजार २०० रुपये दंड वसूल केला.
पीओपी गणेशमूर्ती विक्रीसंदर्भात दिशानिर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार पीओपी गणेशमूर्तीच्या मागे लाल खूण करणे आवश्यक आहे. असे असताना अनेक विक्रेते पीओपी गणेशमूर्ती मातीच्या सांगून विकत आहेत. गुरुवारी ९२ विक्रेत्यांवर कारवाई करून ४३ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला होता. त्यामुळे कारवाईचा एकूण आकडा ३०३ झाला आहे. गुरुवारी २२६ तर, शुक्रवारी ३०० दुकानांची तपासणी करण्यात आली.
न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॉडचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात सर्व दहाही झोनचे ४० स्वच्छता दूत व आरोग्य विभागाचे चमूने ही कारवाई केली. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्यात आली. महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पीओपी गणेशमूर्ती विक्रीसंदर्भात दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, पीओपी गणेशमूर्तीच्या मागे लाल खूण करणे आवश्यक आहे. तसेच, पीओपी गणेशमूर्ती विसर्जन ते निर्माल्य संकलनापर्यंतची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी प्रत्येक विक्रेत्याला दुकानापुढे बॅनर लावणे अनिवार्य आहे. परंतु, विक्रेते दिशानिर्देशांचे पालन करीत नाही. त्यामुळे मनपाने कारवाई मोहीम सुरू केली आहे.
अशी झाली कारवाई
झोन दुकाने दंड
लक्ष्मीनगर ३१ ३०००
धरमपेठ १२ ४०००
हनुमाननगर १८ ३८००
धंतोली २७ १४०००
नेहरूनगर ०९ ९०००
गांधीबाग २१ १२०००
सतरंजीपुरा २० ४०००
लकडगंज २२ १५४००
आसीनगर १५ १२०००
मंगळवारी ३६ ३०००
------------------------------------
एकूण २११ ८०,२००