नागपुरात ५३ स्कूल बस, व्हॅनवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:52 AM2018-07-03T00:52:09+5:302018-07-03T01:01:09+5:30
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने कंबर कसली आहे. गेल्या आठवड्यापासून स्कूल बसची तपासणी मोहीम हाती घेऊन आतापर्यंत ५३ स्कूल बस व व्हॅनवर कारवाई केली. आरटीओच्या या कारवाईने अवैध स्कूल बस व व्हॅनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने कंबर कसली आहे. गेल्या आठवड्यापासून स्कूल बसची तपासणी मोहीम हाती घेऊन आतापर्यंत ५३ स्कूल बस व व्हॅनवर कारवाई केली. आरटीओच्या या कारवाईने अवैध स्कूल बस व व्हॅनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
न्यायालयाचा आदेश व परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ) स्कूलबस व स्कूल व्हॅनची वाहन योग्यता तपासणी दरवर्षी करणे बंधनकारक आहे़ उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत फेरतपासणी करण्याबाबत परिवहन विभागाच्या सूचना आहेत. परंतु स्कूल बसच्या फिटनेसला घेऊन स्कूलबसमालक गंभीर नसल्याचे चित्र आहे. नागपूर शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ८२६ स्कूल बस नोंदणीकृत आहेत. यातील ६८३ स्कूल बसेसला ‘फिटनेस’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. उर्वरित १४३ स्कूल बसने अद्यापही हे प्रमाणपत्र घेतले नसल्याने ‘आरटीओ’ कार्यालयाने गेल्याच आठवड्यात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. परंतु त्यानंतरही या स्कूल बसेस फिटनेस तपासणीसाठी आल्या नाहीत. विशेष म्हणजे, यातील बहुसंख्य स्कूल बसेस विद्यार्थ्यांची ने-आण करीत असल्याने त्या धोकादायक ठरत आहे. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. याची दखल घेत गेल्या बुधवारपासून स्कूल बस तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत २००वर स्कूल बस व व्हॅनची तपासणी करून दोषी आढळून आलेल्या ५३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातून आरटीओला एक लाख २५ हजाराचा महसूल प्राप्त झाला आहे. आरटीओच्या या धडक कारवाईने स्कूल बसचालकांचे धाबे दणाणले आहे.
स्कूल बस तपासणी मोहीम सुरू राहणार
स्कूल बस तपासणी मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. यात दोषी आढळून येणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तर योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना नोटीस बजावण्यात आली आहे. लवकरच परवाना निलंबनाच्या कारवाईला सुरुवात होईल.
अतुल आदे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर