खबरदार! विना परवाना दारू विकत घ्याल तर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 01:55 PM2021-11-11T13:55:45+5:302021-11-11T14:03:26+5:30
झोन तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी कार्यभार सांभाळताच विशेष मोहीम राबवून लायसन्स विना दारु पिणाऱ्या ५७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे मद्यपी आणि दारु विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नागपूर : खून आणि हाणामारीच्या वाढत्या घटनात दारुची महत्त्वाची भूमिका असल्यामुळे दारुच्या दुकानांविरुद्ध झोन तीनच्या परिसरात विशेष अभियान राबविण्यात आले.
आता उत्पादन शुल्क विभागाच्या लायसन्स विना कोणीही दारु खरेदी करु शकत नाही आणि दारुचे सेवनही करू शकणार नाही. झोन तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी झोनचा कार्यभार सांभाळताच विशेष मोहीम राबवून लायसन्स विना दारु पिणाऱ्या ५७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे मद्यपी आणि दारु विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपासून झोन तीनच्या ठाण्याच्या परिसरात गुन्हेगारी वाढली होती. मागील वर्षी १० महिन्यात ९ खुनाच्या घटना घडल्या होत्या. यावर्षी ही संख्या २४ वर गेली आहे. पाचपावली ठाण्याच्या परिसरात सर्वाधिक घटना घडल्या आहेत. यामुळे पोलीस आयुक्तांनी नाईक तलाव चौकीचे नूतनीकरण करून नागरिकांची भेटही घेतली होती. दारु आणि मादक पदार्थांचे सेवन केल्यामुळे बहुतांश घटना घडल्या आहेत.
गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी गजानन राजमाने यांना झोन तीनमध्ये तैनात करण्यात आले आहे. पदभार सांभाळताच सुटीवर गेलेले राजमाने सोमवारी परतले. त्यांनी विना लायसन्स दारुचे सेवन आणि खरेदी करणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरु केली. पहिल्याच दिवशी त्यांनी ५७ मद्यपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध सीआरपीसी ॲक्ट १५१ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली.
उत्पादन शुल्क विभाग २४ तासासाठी परवाना देते. तो परवाना घेऊन दारुचे सेवन करता येऊ शकते. अनेक दारु विक्रेत्यांनी ग्राहकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यासाठी दुकानाजवळच अवैध बांधकाम केले आहे. तेथे दिवसभर मद्यपींची गर्दी असते. स्थानिक प्रशासन दारु विक्रेत्यांशी साटेलोटे असल्यामुळे कारवाई करीत नाही. राजमाने यांनी त्यांच्या झोनमध्ये येणाऱ्या देशी आणि विदेशी दारु दुकानांची पाहणी करून अवैध बांधकामाविरुद्ध कारवाई केली आहे. पाचपावली, तहसील तसेच गणेशपेठ ठाण्याच्या परिसरातील अनेक दारु दुकानांमध्ये अवैध बांधकाम आढळले. तहसील तसेच लकडगंज ठाण्याच्या परिसरात सावजी भोजनालय प्रसिद्ध आहे. त्याच प्रमाणे मोमिनपुरा मादक पदार्थांच्या तस्करीसाठी बदनाम आहे. त्यांच्या विरुद्धही राजमाने यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
या मोहिमेदरम्यान पोलिसांना कुख्यात जगदिश कोसूरकर मिळाला. त्याच्या विरुद्धही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. झोन तीनचे कार्यालयालाही अतिक्रमणाने विळखा घातला आहे. त्यालाही राजमाने यांनी मुक्त केले.
ढाब्यावरही पुरवितात दारू
एकीकडे झोन तीनमध्ये दारु पुरविणाऱ्या हॉटेलच्या संचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे वर्धा मार्गावरील ढाब्यांमध्ये बिनधास्तपणे मद्यपींची मैफील रंगत आहे. वर्धा मार्गावरील बहुतांश ढाब्यांमध्ये शनिवारी आणि रविवारी रात्री ही मैफील भरते. काही ढाब्यांवर तर, रात्री उशिरापर्यंत पार्ट्या चालतात. या ढाब्यांना बेलतरोडी पोलिसांचा आश्रय असल्यामुळे कारवाई करण्यात येत नाही.