नागपुरात विना हेल्मेट ८८ चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:40 AM2019-07-24T00:40:53+5:302019-07-24T00:41:50+5:30
हेल्मेटची सक्ती केलेली असतानाही वापराविषयी उदासीनता दिसून येते. नागरिकांकडून सुरू असलेली टाळाटाळ रोखण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरनेही कंबर कसली आहे. सोमवारी विशेष मोहीम हाती घेऊन ८८ दुचाकी चालकांवर कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हेल्मेटची सक्ती केलेली असतानाही वापराविषयी उदासीनता दिसून येते. नागरिकांकडून सुरू असलेली टाळाटाळ रोखण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरनेही कंबर कसली आहे. सोमवारी विशेष मोहीम हाती घेऊन ८८ दुचाकी चालकांवर कारवाई केली. विशेष म्हणजे, अनेक चालकांकडे इन्शुरन्स, पीयूसी नसल्याने दंडाची रक्कम २३०० ते २५०० च्या घरात पोहचली. ही कारवाई पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न केल्याने अपघातात जीव गमवावा लागतो. भरधाव वाहने चालविणारी तरुणाई हेल्मेटच्या वापराविना अपघाताची शिकार ठरत आहे. अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी वेळावेळी वाहतूक विभागाकडून हेल्मेटबाबत विशेष मोहीम राबविली जाते. परंतु त्यानंतरही नियम तोडणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याचे शहरातील चित्र आहे. सोमवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांच्या मार्गदर्शनात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्या नेतृत्वात विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यासाठी दोन पथक तयार करण्यात आले होते. एका पथकात मोटार वाहन निरीक्षक नरेश पोलानी व सहायक मोटार वाहन निरीक्षक वासुदेव मुगल तर दुसऱ्या पथकात मोटार वाहन निरीक्षक श्याम कासार व सहायक मोटार वाहन निरीक्षक कोपुल्ला होते. कारवाई करण्यात आलेल्या चालकांमध्ये युवक-युवतींचा मोठा समावेश होता. विशेष म्हणजे, कारवाई दरम्यान हेल्मेटचे ५०० रुपये, इन्शुरन्स नसेल तर एक हजार आणि पीयूसी नसेल तर एक हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला. यामुळे अनेकांचा दंड २५०० वर गेला.
‘लोकमत’शी बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, हेल्मेट हे प्राणरक्षक आहे. आरटीओच्यावतीने याविषयी जनजागृतीही करण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही अनेक दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करीत नसल्याने ही कारवाई हाती घेण्यात आली. कारवाई पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचेही आदे म्हणाले.