भरारी पथकाची कारवाई; एसटीचे तिकीट न काढणारे ९९ प्रवासी सापडले जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2022 03:58 PM2022-05-03T15:58:08+5:302022-05-03T16:08:57+5:30
फुकट प्रवास केल्यास प्रवाशांना दुप्पट दंडाला सामोरे जावे लागणार आहे.
नागपूर : एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून संपावर होते; परंतु २२ एप्रिल २०२२ पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. कर्मचारी रुजू झाल्यामुळे सर्व बस रस्त्यावर धावत आहेत; परंतु अनेक प्रवासी तिकीट न घेताच प्रवास करतात. अशा प्रवाशांविरुद्ध एसटी महामंडळाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येते. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या वर्षभराच्या कालावधीत एसटी महामंडळाच्या भरारी पथकांनी तब्बल ९९ फुकट्या प्रवाशांविरुद्ध कारवाई केल्याची माहिती आहे.
एसटीची १० भरारी पथके
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच तिकिटाची रक्कम घेऊन प्रवाशांना तिकीट न देणाऱ्या वाहकांसाठी पूर्वी एसटी महामंडळाची सात भरारी पथके कार्यरत होती; परंतु गेल्या महिनाभरापासून तीन भरारी पथके वाढविल्यामुळे सध्या १० भरारी पथके झाली आहेत.
-फुकट प्रवास कराल, तर होईल दुप्पट दंड
एखाद्या प्रवाशाने तिकीट खरेदी न करता प्रवास केल्यास त्याच्या कडून दंड आकारण्यात येतो. त्या प्रवाशाने चुकविलेले प्रवासभाडे आणि त्या प्रवासभाड्याच्या दुप्पट रक्कम आणि १०० रुपये यापेक्षा जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून वसूल करण्यात येते. त्यामुळे फुकट प्रवास केल्यास प्रवाशांना दुप्पट दंडाला सामोरे जावे लागणार आहे.
गेल्या वर्षभरात दोन लाखांची दंड वसुली
-विना तिकीट प्रवास करणाऱ्या ९९ प्रवाशांवर गेल्या वर्षभरात कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दंडापोटी २०१९६ रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट खरेदी करूनच प्रवास करण्याचे आवाहन एसटीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
एसटीचा महसूल वाढविण्यावर भर
-आधीच आर्थिक टंचाईचा सामना करीत असलेल्या एसटी महामंडळाने आता उत्पन्न वाढीसाठी एकेक पाऊल उचलणे सुरू केले आहे. यात मालवाहतुकीच्या माध्यमातून एसटीचे उत्पन्न वाढविण्यात येत आहे. याशिवाय भरारी पथकांची संख्या वाढवून फुकट्या प्रवाशांचा बंदोबस्त करण्यासाठी एसटीने पाऊल उचलले आहे.
पाच महिन्यांत ६८ कोटींचा तोटा
एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून संपावर गेले होते. त्यामुळे एसटीचे उत्पन्न ठप्प झाले होते. खासगी एजन्सीचे चालक नियुक्त करून एसटीने मोजक्या बस सुरू केल्या होत्या; परंतु संपामुळे पाच महिन्यांत एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला ६८ कोटींचा फटका बसल्याची माहिती आहे.
तिकीट घेऊन प्रवास करावा
‘एसटी बसने प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाने तिकीट खरेदी करून प्रवास करणे आवश्यक आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध एसटीच्या भरारी पथकांतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी तिकीट खरेदी करणे आवश्यक आहे.’
-अभय बोबडे, सहायक वाहतूक निरीक्षक