नागपुरात कलेक्शन सेंटरवर कचरा आढळल्यास एजन्सीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 08:59 PM2019-12-26T20:59:59+5:302019-12-26T21:01:17+5:30
नवीन एजन्सीने प्रत्येक झोनमध्ये दोन ठिकाणी कलेक्शन तयार केले आहे. जुन्या कलेक्शन सेंटरवर कचरा टाकू नये, यासाठी संबंधित एजन्सीने सतर्क असणे आवश्यक आहे. येथे कचरा आढळल्यास संबंधित एजन्सीला जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कचरा संकलनाची जबाबादारी कनक रिसोर्सेस कंपनीकडे असताना शहरातील विविध भागात १०७ ठिकाणी कलेक्शन सेंटर तयार करण्यात आले होते. या सेंटरवर नागरिकांकडून कचरा टाकला जायचा. त्यामुळे परिसरात अस्वच्छता राहायची. कनकचा कंत्राट संपला असून नवीन दोन एजन्सी नियुक्त करण्यात आल्या आहेत. नवीन एजन्सीने प्रत्येक झोनमध्ये दोन ठिकाणी कलेक्शन तयार केले आहे. जुन्या कलेक्शन सेंटरवर कचरा टाकू नये, यासाठी संबंधित एजन्सीने सतर्क असणे आवश्यक आहे. येथे कचरा आढळल्यास संबंधित एजन्सीला जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे.
जुन्या कलेक्शन सेंटरवर स्वच्छता असावी यासाठी त्या ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करणारे फलक लावून त्यावर स्वच्छतादूताचे नाव व संपर्क क्रमांक टाकण्यात आले आहे. यानंतरही जर जुन्या कलेक्शन सेंटरवर कचरा आढळल्यास संबंधित एजन्सीवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी गुरुवारी समितीच्या बैठकीत दिला.
यावेळी उपसभापती नागेश सहारे, सदस्य लहुकुमार बेहते, कमलेश चौधरी, लीला हाथीबेड, विशाखा बांते, सरिता कावरे, आशा उईके, उपायुक्त निर्भय जैन, आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले आदी उपस्थित होते.
बैठकीत जनवारांचे गोठे असलेल्या ठिकाणी शेण, मलमूत्र उचलण्याच्या जबाबदारी संदर्भात धोरण निश्चित करणे, शहरातील लहान व मोठ्या जनावरांच्या अवैध कत्तलीबाबत धोरण निश्चित करणे, सफाई कर्मचारी, जमादार स्वास्थ्य निरीक्षक, झोनल आरोग्य अधिकारी आणि सहायक आयुक्त यांच्या साफसफाईमध्ये संपूर्ण कार्यप्रणाली निश्चित करण्याबाबत धोरणात्मक चर्चा करण्यात आली.
कचरा संकलन संदर्भात छोट्या व मोठ्या गाड्या स्लम वस्तीसाठी वाढविणे, मोकळ्या भूखंडावर कचरा किंवा घाण असल्यास विभागातर्फे कार्यवाही करणे, युपीएचसी व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्तापणे चालणाऱ्या मनपा दवाखान्याचे कामकाज, आरोग्य विभागाचे औषध भंडार कामकाज आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
भूखंडावर कचरा आढल्यास कारवाई
शहरातील रिकाम्या भूखंडांवर कोणतेही बांधकाम होत नसल्याने येथे कचरा टाकला जातो.. वारंवार सफाई करूनही तिथे अस्वच्छता होतेच. याबाबत संबंधित भूखंड मालकाला नोटीस बजावून कारवाई केली जाणार आहे. पडिक शासकीय जमिनीवर काय सुधार योजना राबविण्यात येतील यासंबंधी झोनस्तरावर अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापतींनी दिले.
मनपाची रुग्णालये अद्ययावत करा
टाटा ट्रस्टच्या माध्यमातून नागपूर महापालिकेच्या १८ रुग्णालयांमधील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यात आली आहे. टाटा ट्रस्टचा करार मार्च २०२० पर्यंत आहे. ट्रस्टद्वारे २६ रुग्णालये अद्ययावत होणार होती. त्यापैकी १८ रुग्णालयांचे काम पूर्ण झाले. टाटा ट्रस्टद्वारे मनपाच्याच आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे आरोग्य सुविधा सुधारण्यात आली आहे. याच धर्तीवर मनपाची रुग्णालये अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले.