आठ प्रतिष्ठानांवर कारवाई, ७० हजाराचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:11 AM2021-03-13T04:11:21+5:302021-03-13T04:11:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी आठ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ७० हजारांचा दंड वसूल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी आठ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ७० हजारांचा दंड वसूल केला. दरम्यान, उपद्रव पथकाने शहरातील ७४ प्रतिष्ठान व मंगल कार्यालयांची तपासणी केली. शारीरिक अंतर न पाळणाऱ्यांकडून दंड वसूल केला.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांनी ही कारवाई केली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत पाच मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. धरमपेठ झोनअंतर्गत सात. हनुमाननगर झोन येथील चार प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. धंतोली झोनअंतर्गत सात मंगल कार्यालये व लॉनची तपासणी करण्यात आली. नेहरूनगर झोनमधील ११ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. सतरंजीपुरा झोनमधील सहा प्रतिष्ठानांची, लकडगंज झोनअंतर्गत १० प्रतिष्ठानांची, आशीनगर झोनमध्येही आठ प्रतिष्ठान तर मंगळवारी झोनमधील ११ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली.