‘ड्राय डे’ च्या दिवशी नागपुरात अवैध दारू तस्करांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 10:52 PM2019-08-12T22:52:21+5:302019-08-12T22:57:10+5:30
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी असलेल्या ‘ड्राय डे’च्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या १३ अड्ड्यांवर कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी असलेल्या ‘ड्राय डे’च्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या १३ अड्ड्यांवर कारवाई केली.
दुसरीकडे भरारी पथकाने रविवारी रात्री मानकापूर-जरीपटका रोडवर मार्टिननगर चौकात एका कारमधून मध्य प्रदेशातील प्रतिबंधित दारूच्या ३० पेट्या जप्त केल्या. कारसह ८ लाख ५१ हजाराचा माल जप्त केला. पथकाचे निरीक्षक सुभाष खरे यांनी गुप्त माहिती मिळाली होती की, एका निळ्या रंगाच्या कारमध्ये अवैध दारू मोठ्या प्रमाणावर नागपुरात आणली जात आहे. या आधारावर खरे यांनी पीएसआय विश्वाल कोल्हे, धनराज राऊत, प्रकाश मानकर आदीच्या पथकाने मानकापूर चौकात नजर ठेवली. पथकाला मानकापूर चौकातून जरीपटक्याच्या दिशेने एक निळ्या रंगाची कार (एमएच/०१/एवी/६८९२) जाताना दिसली. पथकाने कारचा पाठलाग केला. पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच मार्टिननगर चौकात कार चालक व एक साथीदार कार सोडून पळाले. कारची झडती घेतली असता कार चालकाच्या सीटखाली गोवा व्हिस्कीच्या १५ पेट्या सोपडल्या. तसेच कारच्या डिक्कीतही १५ पेट्या ठेवल्या होत्या. फरार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने सोमवारी वाडी परिसरात एकाकडून ७३ हजार रुपये किमतीची दारू पकडली. पोलिसांनी दारूच्या ११ पेट्या जप्त केल्या.
अवैध विक्रेत्यावर गुन्हा दाखल
पथकाने वाडी परिसरातील एका अवैध दारू विक्रीत सहभागी असलेल्या काटोल रोडवरील तवक्कल ले-आऊट येथील आरोपी गणेश हीरास्वामी नायडू याला अटक केली. त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१३ ठिकाणांहून दारू जप्त
यासोबतच अबकारी विभागाच्या पथकाने सोमवारी जिल्ह्यातील १३ ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली. यात २०५ लीटर अवैध दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत हातभट्टीची ८२ लीटर, देशी २७ लीटर, आणि विदेशी ९६ लीटर दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक केशव चौधरी, सुभाष हनवते, सुभाष खरे, सुनील सहस्त्रबुद्धे, दुय्यम निरीक्षक दिलीप बडवाईक, सार धिडसे, रावसाहेब कोरे व पथकाने केली.