तोतलाडोह धरणात अवैध मासेमारांवर कारवाई; बोटीसह ५० किलो जाळे पकडले
By निशांत वानखेडे | Published: June 27, 2023 04:44 PM2023-06-27T16:44:53+5:302023-06-27T16:50:56+5:30
आरोपी मध्य प्रदेशात पळाले
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत तोतलाडोह धरणात मासेमारीवर प्रतिबंध असतानाही स्थानिकांकडून प्रतिबंध तोडले जात आहेत. या अवैध मासेमारी करणाऱ्यांवर नियंत्रणासाठी वनविभागाने कारवाई सत्र चालविले आहे. अशाच कारवाईत सोमवारी मासेमारांची एक बोट आणि ५० किलो जाळे जप्त केले. कारवाईचा सुगावा लागल्याने आरोपी मासेमार साहित्य सोडून मध्य प्रदेश राज्यात पळून गेले.
तोतलाडोह धरण पेंच व्याघ्र प्रकल्पात असल्याने येथे मासेमारी करण्यास कायद्याने प्रतिबंध घातला आहे. मात्र स्थानिकांकडून अवैधरित्या मासेमारी केली जाते. यावर पाळत ठेवण्यासाठी वनविभागाकडून पेंच प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दल (एसटीपीएफ) तैनात करण्यात आले आहे. याअंतर्गत नियमित गस्ती करणे, अंबूश लावणे, वन्यप्राणी बचावासाठी मदत करण्याचे काम केले जाते.
याच कारवाईअंतर्गत रविवारी रात्री तोतलाडोह धरणात गस्तीसाठी चमु गेली असता काही लोक मध्य प्रदेश राज्याच्या सीमेकडून बोटी घेऊन धरणात येत असल्याचे दिसले. एसटीपीएफ टीमने या मासेमारांवर कारवाई केली व दीड लक्ष रुपये किंमतीचे बोट, जाळे व इतर साहित्य जप्त केले. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.