अवैध सावकाराविरुद्ध कारवाई

By admin | Published: January 7, 2015 01:02 AM2015-01-07T01:02:37+5:302015-01-07T01:02:37+5:30

सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे या कार्यालयातील पथकाने सावनेर शहरातील अवैध सावकाराच्या घरी मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास धाड टाकली.

Action against illegal lenders | अवैध सावकाराविरुद्ध कारवाई

अवैध सावकाराविरुद्ध कारवाई

Next

पाच जणांवर गुन्हे दाखल
सावनेर : सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे या कार्यालयातील पथकाने सावनेर शहरातील अवैध सावकाराच्या घरी मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास धाड टाकली. सावकाराच्या घराच्या झडतीदरम्यान १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर आढळून आला असून, आक्षेपार्ह दस्तऐवज आढळून आले नाही. या प्रकरणी सावनेर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, अटकपूर्व जामीन मिळविल्याने कुणालाही अटक करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई होय.
गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सेवकराम राऊत रा. कोदेगाव, ता. सावनेर, सुरेश भापकर रा. गणेश मंदिराजवळ प्रतापनगर नागपूर, आनंदराव सोमकुवर रा. टेकाडी, नीलेश सोमकुवर रा. टेकाडी व भूजंग कुंभरे रा. टेकाडी या पाच जणांचा समावेश आहे. फिर्यादी बळवंत अनंतराम कुहिटे रा. बरडेनगर, नागपूर यांनी अवैध सावकारीसंदर्भात सावनेर येथील सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. बळवंत कुहिटे यांनी सेवकराम राऊत यांच्याशी ४ जुलै २०१३ रोजी नोंदणीकृत पद्धतीने जमिनीच्या खरेदी - विक्रीचा करण्यात आला होता. तसेच चंद्रशेखर यांच्या घराच्या विक्रीबाबत १३ मार्च २०१४ रोजी करारनामा करण्यात आल्याचे या तक्रारीत नमूद केले होते. हा व्यवहार अवैध सावकारीचा असल्याचेही तक्रारकर्त्यांचे म्हणणे होते.
सदर तक्रारीची शहानिशा करण्यासाठी पथक तयार करण्यात आले. या पथकाने मंगळवारी दुपारी सेवकराम राऊत यांच्या सावनेरातील घराची झडती घेतली. ते होळी चौकात किरायच्या घरात राहतात. या ठिकाणी नारायण लक्ष्मण सोमकुवर रा. टेकाडी यांच्या नावे असलेला १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर आणि चंद्रशेखर भाऊराव कापसे रा. कोथुळणा यांच्या शेतीच्या विक्रीचा करारनामा आढळून आल्याची माहिती पथकातील सदस्यांनी दिली. सदर कारवाई महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये केली असून, या प्रकरणी सावनेर पोलिसांनी भादंवि ४२०, ४४७, ३४, १२० (ब) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पथकात सहायक निबंधक अशोक गिरी सावनेर, चैतन्य नासरे कामठी, प्रकाश भजने उमरेड, सुखदेव कोल्हे, संजय आगरकर, पंकज घोडे, नरेश अवचट, अतुल तांबे आदींचा समावेश होता. (तालुका/प्रतिनिधी)
बळजबरीने घेतला शेतीचा ताबा
फिर्यादी बळवंत कुहिटे यांची टेकाडी शिवारात वडिलोपार्जित शेती आहे. आर्थिक अडचणीमुळे कुहिटे यांनी मुलीच्या शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची उचल केली होती. त्या मोबदल्यात त्यांनी त्यांच्या शेतीची विक्री रजिस्ट्री करून दिली होती.
कुहिटे यांनी सदर रक्कम परत केल्यानंतर शेतीचे विक्रीपत्र परत देण्याचे त्यांना तोंडी सांगण्यात आले होते. मात्र, त्यांची शेती सेवकराम राऊत, सुरेश भापकर, आनंदारव सोमकुवर, नीलेश सोमकुवर आणि भूजंग कुंभरे यांनी बळजबरीने हडपल्याचा उल्लेख त्यांनी तक्रारी केला होता. यासंदर्भात कुहिटे यांनी २५ नोव्हेंबर २०१४ रोजी सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात तक्रार दाखल केली होती.

Web Title: Action against illegal lenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.