रेल्वेच्या ई-तिकिटांचा अवैध आरक्षण करणाऱ्याविरुद्ध कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 04:39 PM2024-11-30T16:39:51+5:302024-11-30T16:41:46+5:30
रेल्वे तिकिटांचे अवैध बुकिंग : ५४ तिकिटांसह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :रेल्वेच्या ई तिकिटाचे अवैध आरक्षण करून मिळविलेल्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका आरोपीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५४ ई- तिकिटे तसेच मोबाइल जप्त करण्यात आला. आरोपीचे नाव शुभम कमलाकर सूर्यवंशी असून तो बिनाकी ले-आऊटमधील यादवनगरात राहतो. आरोपीचे चिकन शॉप आहे. त्या आडून तो हा गोरखधंदा करीत असल्याचे उघड झाले आहे.
रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणारे एक मोठे रॅकेट अनेक वर्षांपासून नागपुरात सक्रिय आहे. हे आरोपी त्यांच्या संपर्कातील व्यक्तीच्या युजर आयडीचा गैरवापर करून वेगवेगळ्या मार्गावरच्या, वेगवेगळ्या गाड्याची तिकीटे तयार करतात आणि गरजू प्रवाशांना त्या विकतात.
एका तिकिटावर हे दलाल तीनशे ते पाचशे रुपये जास्त घेतात. अशाप्रकारे घरबसल्या ही मंडळी रोज हजारो रुपये कमवत असतात. वर्धमाननगर, गांधीबाग, जरीपटका, सदर, लकडगंज, धरमपेठ, खामला, सीताबर्डीसह अन्य काही भागांत अशा दलालांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. कारवाईचे अधिकार असणाऱ्या संबंधितांपैकी अनेकांना त्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्याशी मधुर संबंध असल्यामुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई होताना दिसत नाही.
सहा लाइव्ह तिकिटे, ४८ जुनी तिकिटे जप्त
रेल्वे पोलिसांच्या एका पथकाला गुरुवारी ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली. त्यावरून सहायक पोलिस उपनिरीक्षक अश्विन पवार, मुकेश राठोड, सचिन दलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींना आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रेल्वेचे सहा लाइव्ह तिकीट तसेच ४८ जुने तिकीट तसेच मोबाइल जप्त करण्यात आला. एका तिकिटावर आपण २०० ते ३०० रुपये जास्त घेऊन हे तिकीट अवैधपणे रेल्वे प्रवाशांना विकत असल्याची माहितीवजा कबुली आरोपीने पोलिसांना दिली. त्याच्याविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम २४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.