राजकीय सुडाच्या भावनेतून नितेशवर कारवाई, नारायण राणे यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 02:26 PM2021-12-27T14:26:46+5:302021-12-27T14:51:59+5:30
आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई सुरू असल्याबाबत प्रश्न विचारले असता कसली अटक, काय केले त्यांनी? असे म्हणत नारायण राणेंनी आरोप फेटाळून लावले.
नागपूर : आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला पराभव दिसत आहे. त्यामुळे राजकीय सुडाच्या भावनेने आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई केली जात असल्याचा आरोप केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला.
नारायण राणे आज एग्रोव्हीजन या कृषी प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई सुरू असल्याबाबत विचारले असता कसली अटक, काय केले त्यांनी? असे म्हणत राणेंनी आरोप फेटाळून लावले.
नितेश राणे यांनी काहीही केलेले नाही. त्यांचा संबंधच नाही. सत्ताधारी पक्षाला येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ही कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहेत. ते कुठेही अज्ञातवासात गेलेले नाही. ते आमदार आहेत. त्यांना अज्ञातवासात जाण्याची गरज नाही. सरकारला जे करायचे आहे, ते त्यांनी करावे. कुणालाही मारहाण करण्यात त्यांचा काहीही संबंध नाही, असेही नारायण राणे यांनी सांगितले. अशाप्रकारची कारवाई होत असल्याचे समजल्याने काेर्टात जावेच लागले, असेही ते म्हणाले.
नेमके प्रकरण काय?
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. सचिन सातपुतेच्या अटकेनंतर आता शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करावी, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिसऱ्यांदा नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, नितेश राणे एकदाही चौकशीला आले नाहीत. पोलीस नितेश राणे यांच्या घरीही गेले होते. मात्र, नितेश राणे तेथेही उपस्थित नव्हते. मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला नितेश राणे यांनी हजेरी लावल्यास मुंबई पोलिसांच्या मदतीने नितेश राणे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते, असाही कयास बांधला जात आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चार्टर्ड विमानातून नितेश राणे दिल्लीला जाऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी गोवा विमानतळाशी संपर्क साधून तिथूनही अटकेची तयारी केल्याचे म्हटले जात आहे.