Maharashtra Election 2019; मतदानासाठी सुटी न देणाऱ्याविरुद्ध होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 11:14 AM2019-10-18T11:14:09+5:302019-10-18T11:19:47+5:30
विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आपल्या कामगारांना सुटी अथवा सवलत न देणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा नागपूर जिल्हाधिकारी अथवा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आपल्या कामगारांना सुटी अथवा सवलत न देणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अथवा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिला आहे. विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक येत्या २१ ऑक्टोबर रोजी होत असून त्याअनुषंगाने मतदार संघात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळे, केंद्र शासनाची सर्व कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच बँकांनाही सार्वजनिक सुटी देण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी ऐवजी दोन ते तीन तासाची सुटी देणे बंधनकारक आहे. ज्या कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क दोन ते तीन तासात बजावता येणार नाही अशा कामगारांना भरपगारी सुटी देण्यात यावी. मतदानाच्या हक्काबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहील. अशा आस्थापनांविरुद्ध भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहे.