नागपुरात उपद्रवी वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:02 AM2018-08-17T01:02:41+5:302018-08-17T01:20:33+5:30
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रॅलीच्या नावाखाली रस्त्यावर गोंधळ घालू पाहणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४६४५ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रॅलीच्या नावाखाली रस्त्यावर गोंधळ घालू पाहणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४६४५ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. शहरातील विविध मार्गावर उपद्रवी वाहनचालक आरडाओरड करून गोंधळ घालतात. वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अपघातही होतात.
फुटाळा परिसरात तर त्यांचा हैदोसच असतो. स्वातंत्र्यदिनाचा सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा करता यावा आणि या राष्ट्रीय सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून, उपद्रवी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आले होते. त्यानुसार, उपद्रवी वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी १४ आॅगस्टच्या सायंकाळपासूनच विशेष मोहीम राबविण्यात आली.
या विशेष मोहिमेंतर्गत पोलिसांनी ट्रीपल सीट दुचाकी चालविणारे २५५, राँग साईड वाहन चालविणे ५४, दारूच्या नशेत वाहन चालविणे ४९, बेदरकारपणे वाहन चालविणे १७ तसेच नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्या २७१ जणांवर कारवाई केली. ९१४ वाहनचालकांना जागच्या जागी चालान देण्यात आले. तर सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे सिग्नल तोडून पळणाऱ्या २०२१ वाहनचालकांना ई-चलान पाठविण्यात आले. १७१० वाहनचालकांवर फोटोच्या आधारे (सिग्नलवर फोटो काढून) फोटो ई-चालान कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ४६४५ वाहनचालकांवर वेगवेगळी कारवाई करण्यात आली. कागदपत्रे न बाळगणाऱ्या ११६ चालकांकडून त्यांची वाहने तात्पुरती ताब्यात घेण्यात आली.